MH13NEWS Network
सोलापूर, दि. १७ ऑक्टोबर २०२५ —विजापूर नाका पोलिस ठाण्यात दाखल गांजा तस्करी प्रकरणातील आरोपी संतोष दत्तात्रय चव्हाण (रा. नीरा नृसिंहपूर, ता. इंदापूर, जि. पुणे) यास सोलापूर येथील विशेष सत्र न्यायाधीश श्री. वाय. ए. राणे यांनी जामीन मंजूर केला आहे.
असे आहे प्रकरण..
घटनेप्रमाणे, दि. १६ ऑगस्ट २०२५ रोजी विजापूर नाका पोलिसांना जय भवानी झोपडपट्टी येथे गांजा विक्री होणार असल्याची माहिती मिळाली होती.

त्यानुसार सापळा रचून कारवाई केल्यावर तीन जण गांजा विक्रीसाठी आल्याचे पोलिसांना आढळून आले. या प्रकरणी गु.र. क्र. ४३८/२०२५ अन्वये एन.डी.पी.एस. कायद्यातील कलम ८(क), २०(ब)(२) व २९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान आरोपी संतोष चव्हाण याचे नाव समोर आल्याने पोलिसांनी त्याला १९ सप्टेंबर २०२५ रोजी अटक केली होती. आरोपीतर्फे ॲड. देवदत्त बोरगावकर यांनी विशेष सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला.
सुनावणीदरम्यान बचाव पक्षाने मांडले की, आरोपी घटनास्थळी नव्हता, एफ.आय.आर.मध्ये त्याचे नाव नाही तसेच कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नाही. सरकारी पक्षाने त्यास हरकत घेतली असली तरी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज मंजूर केला
सदर प्रकरणात आरोपीतर्फे ॲड. देवदत्त बोरगावकर, ॲड. गुरुदत्त बोरगावकर, ॲड. शिवानी करवा व ॲड. निकिता कुलकर्णी यांनी काम पाहिले, तर सरकार पक्षातर्फे ॲड. शीतल डोके यांनी बाजू मांडली.