MH 13News Network
आर्चरी असोसिएशनचे अध्यक्ष खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी आज शुक्रवारी दुपारी अकलूज येथील कार्यालयात आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी भारताचे प्रतिनिधित्व करणारा सोलापूर जिल्ह्यातील पहिलाच धनुर्धर साईराज हणमे यास पुढील कारकीर्दीसाठी शुभेच्छा देऊन मी आहे सोबत असा शब्द दिला.
आर्चरी हा महागडा क्रीडा प्रकार असून सर्वसामान्य कुटुंबांच्या आवाक्याच्या बाहेर आहे. याची जाणीव मला आहे. लवकरच माढा तालुक्यातील अरण येथे मोठे आर्चरी सेंटर करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. आजपर्यंत जवळपास 20 पेक्षा अधिक खेळाडूंना या खेळाच्या माध्यमातून नोकरी प्राप्त झाली आहे. कष्ट करणाऱ्या विद्यार्थ्यांना भविष्यात मोठ्या संधी आहेत. परदेशात चायनीज तायपे या ठिकाणी पुढील महिन्यांमध्ये आंतरराष्ट्रीय आर्चरी स्पर्धा होणार आहेत. भारतासाठी त्याचे प्रतिनिधित्व मूळ ग्रामीण भागातून आलेला विद्यार्थी करत असल्याचा आनंद आहे असेही त्यांनी सांगितले.
सद्यस्थितीत क्रीडा विभागाकडून आर्चरी या क्रीडा प्रकारासाठी साहित्य वितरण केले जात नाही. याची तातडीने दखल मोहिते पाटील यांनी घेतली. यासाठी प्रशासकीय पातळीवर योग्य तो पाठपुरावा करण्याचे त्यांनी आश्वासन दिले.
मूळ माढा तालुक्यातील हा खेळाडू असल्याचा जिल्ह्याला अभिमान आहे असे सांगताना सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी कोणत्याही प्रकारची अडचण येऊ देणार नाही असा विश्वास त्यांनी यावेळी हणमे याला दिला.
या आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रकारासाठी लागणाऱ्या क्रीडा साहित्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी जागेवरच दिले.