MH 13 News Network
उत्तर सोलापूरातील बाळे भागातील राजेश्वरी नगरमध्ये चिखलाचे साम्राज्य पसरले असून वाहनधारकांना आणि स्थानिक नागरिकांना अक्षरशः नरक यातना भोगाव्या लागत आहेत. आमचा कोणी वाली उरला नाही अशी भावना व्यक्त केली जात असून नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. शाळकरी मुलांना तसेच वृद्ध आणि महिलांना याचा विशेष त्रास होत आहे.
बाळे भागातील राजेश्वरी नगर या ठिकाणी पंधरा वर्षानंतर सुरू केलेले पाईपलाईनचे कामकाज केवळ दीड दिवसात ठप्प पडले. त्यानंतर या भागात रस्ताच नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर चिखल निर्माण झाला होता.
सततच्या पावसामुळे आणि ठेकेदाराने अर्धवट केलेल्या कामामुळे मोठ्या प्रमाणावर चिखलाचे साम्राज्य पसरले असून वाहनधारकांना आणि स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
मुरूम टाकण्यासाठी कोणताच मंजूर मक्तेदार काम करत नसून झोन कार्यालयाकडे बजेट नसल्याची माहिती नगर अभियंता सारिका अकुलवार यांनी प्रतिनिधीशी बोलताना दिली.
ना धड रस्ता ना पाईपलाईन..! अशा अवस्थेत काम बंद पडलेले असून नागरिकांमधून मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरलेली आहे.
दरम्यान, स्थानिक आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिलेल्या निधीमधून पाईपलाईनचे काम सुरू झाले होते. काम ठप्प झाल्याची बातमी समजल्यावर देशमुख यांनी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्याला ताबडतोब बोलावून घेऊन सूचना दिल्या. त्यानंतर पाच दिवस लोटून गेले, अद्यापही काम जैसे थे परिस्थितीमध्ये आहे.
रखडलेले काम पूर्ण करावे तसेच या ठिकाणी चांगला रस्ता करावा अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.