MH 13News Network
⭕ थेट अंतरावली सराटीतून |वृध्द मराठा स्त्री- पुरुष ही बसणार आमरण उपोषणाला, आरक्षण नाही, इलेक्शन नाही..! वाचा सविस्तर👇
मनोज जरांगे पाटील यांनी आज बुधवारी दुपारी आंदोलनाची पुढील दिशा जाहीर केली असून या बैठकीत हजारो मराठा समाज बांधव आणि मराठा समन्वयक यांची उपस्थिती होती. महिला मराठा आंदोलकांचा समावेश हा लक्षणीय होता. यावेळी वृद्ध स्त्री व पुरुष आमरण उपोषणाला बसणार असल्याचे जाहीर केले असून, जोपर्यंत मराठा आरक्षण नाही तोपर्यंत इलेक्शन घेऊ नये अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी आज अंतरवाली सराटीतून केली.
आजच्या बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे..
२४ फेब्रुवारीपासून मराठ्यांचे राज्यभर “आदर्श रास्तारोको” आंदोलन सुरु होणार.
प्रत्येक मराठ्याने आपापल्या गावाची/शहराची जबाबदारी सांभाळावी.
सरकारने आश्वासित केल्याप्रमाणे सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी. यासाठी हे आंदोलन असेल. दररोज शासनाला निवेदन दिले जाईल.
रास्ता रोको आंदोलनाची वेळ सकाळी १०.३० ते दुपारी १:०० आणि सायंकाळी ४:० ते ७:०० असेल.
या वेळात गावातील सर्व मराठे रस्त्यावर येऊन ठाण मांडतील. आंदोलन दररोज आणि बेमुदत काळासाठी असेल.
आंदोलन शांततेत होईल परंतु एकही गाडी पुढे जाणार नाही.
राजकीय नेत्यांना (जिल्हा परिषद सदस्य, सभापती आजी-माजी आमदार, खासदार, मंत्री) यांना यापुढे मराठे दारात येऊ देणार नाहीत.
परीक्षेचा काळ सुरु आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर व घरी जाण्यास त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. मराठा आंदोलकांनी स्वतःच्या गाडीवरून त्यांना परीक्षा केंद्रावर सोडवण्याची जबाबदारी पार पाडावी.
गावातील मुख्य रस्ता कोणताही असो, जिल्हामार्ग, राज्यमार्ग किवा राष्ट्रीय महामार्ग,आंदोलन काळात सर्व रस्ते बंद राहतील.
१ मार्चला राज्यातील मराठा समाजातील वृद्ध स्त्री पुरुष हे मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आमरण उपोषणाला बसणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा पाटील यांनी आज अंतरवाली सराटी मध्ये केली आहे. जगाच्या आजपर्यंतच्या आंदोलनामध्ये अशा पद्धतीने टोकाची भूमिका घेतलेला पहिले आंदोलन म्हणून या घटनेकडे पाहिले जाईल अशी चर्चा यावेळी या परिसरात सुरू होती.
त्यानंतर अंतरवाली सराटी येथे सर्व आजी-माजी मराठा आमदार खासदार, मंत्री यांची बैठक होणार. सगेसोयरे बद्दल काय भूमिका घेतात, यावरून तो नेता मराठ्यांच्या बाजूने की विरोधात हे समाज ठरवणार.
३ मार्चला प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एकच मोठा रास्ता रोको होणार. या रास्तारोकोला जिल्ह्यातील मराठा बांधव लाखोंच्या संख्येने जमणार.
निवडणूक जवळ आली आहे. प्रचारासाठी एकही गाडी गावात येणार नाही. आली तर परत जाणार नाही.असे नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
२४ तारखेपासून राज्यात पुन्हा मराठा आरक्षणासाठी आंदोलन उभे करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आलं आहे.