MH 13 News Network
महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी होम मैदानावर जाहीर सभाभाजपा प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांची माहिती : दुपारी २ वाजता सोलापूरकरांनी उपस्थित राहण्याचे आवाहनसोलापूर : प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीतील भाजपा आणि महायुतीच्या जिल्ह्यातील सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा मंगळवारी (दि.१२) दुपारी २ वाजता होम मैदानावर आयोजित करण्यात आल्याची माहिती भाजपाचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
भाजपा प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे म्हणाले, महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय (ए), रयत क्रांती संघटना आणि महायुती सरकारने हजारो कोटी रुपयांचा निधी देऊन विकासाच्या योजना राबवल्या आहेत.
महिला, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, तरुण, कामगार अशा सर्व क्षेत्रातील नागरिकांना सक्षम सुशासन देण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केले आहे. प्रामाणिक हेतूने राज्याचा विकास करणाऱ्या महायुतीला जनतेचा संपूर्ण राज्यभर प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
विधानसभा निवडणुकीबाबत सोलापूरकरांशी संवाद साधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापुरात येत आहेत. संपूर्ण जिल्हावासियांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाची उत्सुकता लागून राहिली आहे. या सभेसाठी एक लाख नागरिक उपस्थित राहतील असा विश्वासही श्री. पांडे यांनी व्यक्त केला.
अशी आहे पार्किंग व्यवस्था..
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी येणाऱ्या नागरिकांकरिता वाहनतळाची व्यवस्था हरिभाई देवकरण प्रशालेचे मैदान, मंगळवेढेकर इन्स्टिट्यूटचे मैदान, होमगार्ड मैदान, जुनी मिल कंपाऊंड, येथे करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय (ए), रयत क्रांती संघटना आणि महायुतीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तसेच नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबोधन ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने होम मैदानावर उपस्थित रहावे, असे आवाहनही भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांनी याप्रसंगी केले.
या पत्रकार परिषदेस भाजपाचे विभागीय संघटनमंत्री मकरंद देशपांडे, शहर अध्यक्ष नरेंद्र काळे, माजी शहराध्यक्ष विक्रम देशमुख, जिल्हा सरचिटणीस शशिकांत चव्हाण, मोहन डांगरे आदी उपस्थित होते.