MH 13 News Network
राजकीय पक्षांनी शहरी समस्यांवर लक्ष देऊन जनमत तयार करणे गरजेचे : डॉ. अशोक चौसाळकर
पत्रकार सागर सुरवसे, आफताब शेख आणि मनीषा जाधव यांना देशभक्त कृ.भी. अंत्रोळीकर स्मृती प्रतिष्ठानच्या पुरस्काराचे वितरण
सोलापूर ( प्रतिनिधी) : ज्या राजकीय पक्षांनी स्वतःला बदलले नाही ते पिछाडीवर पडले आहेत. सुरवातीच्या काळात 37 टक्के लोक शहरात तर उर्वरित लोक ग्रामीण भागात राहत होते. मात्र आता 50 टक्के पेक्षा जास्त लोक शहरात राहत आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांनी शहरी समस्यांवर लक्ष देऊन जनमत तयार करणे गरजेचे आहे अन्यथा ते पक्ष लयाला जातील असे परखड मत ज्येष्ठ राजकीय अभ्यासक डॉ. अशोक चौसाळकर यांनी व्यक्त केले.
देशभक्त डॉ. कृ. भी अंत्रोळीकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने पत्रकार सागर सुरवसे यांना ‘गजनफर’कार अब्दुल रसूल कुर्बान हुसेन पुरस्कार, आफताब शेख यांना ‘कर्मयोगी’कार रामभाऊ राजवाडे पुरस्कार तर देशभक्त अंत्रोळीकर समाजसेवा पुरस्कार मनीषा जाधव यांना देण्यात आला. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य नरेश बदनोरे, अध्यक्ष डॉ. श्रीकांत येळेगावकर, मोहन अंत्रोळीकर, सुजाता अंत्रोळीकर आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना श्री. चौसाळकर म्हणाले, 1983 नंतर कोणत्याही एका पक्षाचे सरकार सत्तेत आले नाही. त्या तुलनेत भाजपने मागील तीन निवडणुकात सातत्य राखत 100 ते 132 पर्यंत मजला मारली आहे मात्र इतर पक्षांना ते शक्य झालेले नाही. त्याचबरोबर राहुल गांधी जुनेच मुद्दे घेऊन राजकारण करत आहेत त्यामुळे त्यांना अपेक्षित यश भेटत नाही आणि भेटणारही नाही. त्यांना नवीन मुद्दे घेऊन राजकारणात उतरावे लागेल असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
यावेळी प्रास्ताविकपर भाषणात डॉ. श्रीकांत येळेगावकर म्हणाले, डॉ. कृ. भी. अंत्रोळीकर यांना एकदा आरोग्यमंत्री तर दुसऱ्यांना राज्यपाल पदाची संधी आली होती मात्र त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून नाकारली. आजच्या काळात ती बाब दुर्मिळ आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष नरेश बदनोरे म्हणाले, राजकारणात नैतिकता, तत्व असणे गरजेचे आहे. अन्यथा समाजव्यवस्था रसातळाला गेल्याशिवाय राहणार नाही. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यांनी केले तर मोहन अंत्रोळीकर यांनी आभार मानले.