प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ल्याचा निषेध: मराठा समाज आक्रमक, उद्या सोलापूरमध्ये तातडीची बैठक
प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ल्याचा निषेध: मराठा समाज आक्रमक, उद्या सोलापूरमध्ये तातडीची बैठक
सोलापूर प्रतिनिधी –अक्कलकोट येथे रविवारी प्रवीण गायकवाड यांच्यावर करण्यात आलेल्या भ्याड आणि निष्कारण हल्ल्याच्या तीव्र निषेधार्थ सोलापूरमध्ये मराठा समाज आक्रमक झाला आहे.

हल्लेखोरांविरोधात तत्काळ कलम ३०७ (हत्या करण्याचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी उद्या, मंगळवार १५ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता, शासकीय विश्रामगृह, सात रास्ता, सोलापूर येथे तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीत समाजकंटकांकडून झालेल्या अपमानास्पद हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात येणार असून, पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे, अशी माहिती समन्वयक माऊली पवार यांनी दिली.
प्रवीण गायकवाड हे एका कार्यक्रमासाठी अक्कलकोट येथे आले असताना, काही समाजकंटकांनी त्यांच्या अंगावर शाही फेकून तोंडाला काळं फासलं. ही घटना केवळ व्यक्तीवर नाही, तर संपूर्ण समाजाच्या प्रतिष्ठेवर झालेला आघात आहे. त्यामुळे महाराष्ट्रभरातून याला विरोध होत आहे.
सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा, सोलापूर यांच्या वतीने या बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, सोलापूरसह राज्यभरातील तमाम मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.