“दीड किमी पायी चालून योजनेचा आढावा” — शिष्यपाल सेठी यांची बीबीदारफळ जलजीवन मिशनच्या कामांना गती देण्याची सूचना
सोलापूर – “गाव पातळीवरील पाणी व स्वच्छता समिती बळकट करा, कामांचा दर्जा राखा आणि लोकांपर्यंत योजनेचा लाभ पोचवा”, असे आवाहन केंद्र शासनाचे पाणी व स्वच्छता सल्लागार शिष्यपाल सेठी यांनी आज सोलापूर जिल्ह्यातील बीबीदारफळ येथे पाहणीदरम्यान केले.

जिल्हा परिषद कार्यालयात झालेल्या बैठकीत जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. प्रकल्प संचालक अमोल जाधव यांनी स्वागत करून जिल्ह्यातील प्रगतीचा आढावा दिला. निधीअभावी काही कामांवर परिणाम होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

ग्रामपंचायतीत थेट संवाद – प्रत्यक्ष पाहणी
शिष्यपाल सेठी यांनी बीबीदारफळ ग्रामपंचायतीस भेट देत ग्रामस्थांशी थेट संवाद साधला. सरपंच अर्चना ननवरे व उपसरपंच नारायण सर्वगोड यांच्या उपस्थितीत गावातील विहीर, टाकी, पाईपलाईन, तसेच सार्वजनिक व वैयक्तिक शौचालयांची पाहणी करण्यात आली.
तलाव ते नळ कनेक्शन – पायी चालत सखोल पाहणी..!

विशेष म्हणजे, शिष्यपाल सेठी यांनी बीबीदारफळ तलावातून अकोलेकाटी ग्रामपंचायतीपर्यंतच्या पाणीपुरवठा योजनेची दीड किलोमीटर अंतर पायी चालत प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी विहिरीतील पाणीपातळी, नळ कनेक्शनद्वारे येणारा पाण्याचा दाब, व महिला सदस्यांकडून पाण्याचे नमुने तपासले.
दुष्काळी परिस्थितीत बदलते स्त्रोत..

उपकार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड यांनी इंग्रजी व हिंदी भाषेत सोलापूर जिल्ह्याच्या दुष्काळी पार्श्वभूमीवर सतत बदलणाऱ्या जलस्रोतांची माहिती दिली. वाढती लोकसंख्या आणि त्यानुसार वाढणारी पाण्याची मागणी याकडेही लक्ष वेधले.
कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी यांनी सर्व कामांचे सादरीकरण केले. बीआरसी मोनिका दिनकर, आम्रपाली गजघाटे यांनी पाणी व स्वच्छता समितीची माहिती दिली, तर सोनाली कुलकर्णी यांनी पाणी गुणवत्तेवर सविस्तर माहिती दिली.