MH13NEWS Network
सोलापूर महापालिकेच्या आगामी निवडणुकांचा बिगुल वाजला असून सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ‘तिकीट मिळतंय का जातंय’ या अनिश्चिततेत अनेकांनी आपले “देव पाण्यात ठेवले” असताना, आज विमानसेवेच्या उद्घाटन कार्यक्रमात एक वेगळीच राजकीय झलक पाहायला मिळाली.

शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखांनी मुख्यमंत्र्यांच्या सोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. त्यामुळे नेमकं काय बोलणं झालं..! याबाबत अनेकांनी प्रश्नचिन्ह उभे केले होते. यावर विशेष प्रतिनिधींनी जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता त्यांनी याबाबत माहिती दिली..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोलापूर–मुंबई विमानसेवा उद्घाटनावेळी, शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख अमोल (बापू) शिंदे यांनी व्यासपीठावरच मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीची शक्यता सकारात्मक असल्याचे संकेत दिले.
यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार श्री जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, आमदार देवेंद्र कोठे उपस्थित असल्याची माहिती जिल्हाप्रमुख शिंदे यांच्याकडून देण्यात आली आहे.
“महायुती झालीच तर सोलापूर महापालिकेवर भगवा फडकणार, यात शंका नाही,” असा विश्वास शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांसमोर व्यक्त केला.
आज बुधवारी झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी आयटी पार्क, पिण्याच्या पाण्याची पाइपलाईन, तसेच विरोधकांवरील शाब्दिक फटके अशा विविध विषयांवर भाष्य केले. भाषणानंतर झालेल्या चर्चेत शिंदे यांनी महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भात काही महत्त्वाचे राजकीय मुद्दे मुख्यमंत्र्यांसमोर मांडले.
जिल्हाप्रमुख शिंदे यांची प्रतिक्रिया..
“राज्यात महायुतीचे सरकार सक्षमतेने कारभार करत आहे. लोकोपयोगी योजना राबवल्या जात आहेत. पक्षाच्या जिल्हाप्रमुख म्हणून मी मुख्यमंत्र्यांसमोर शहरातील कार्यकर्त्यांची भावना मांडली की, भाजपाने आमच्यासोबत राहावे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गट यांना महापालिकेत रोखायचे असेल तर महायुती होणे गरजेचं असल्याचं मुख्यमंत्र्यांसमोर मी मांडले आहे. मुख्यमंत्र्यांनी महायुतीबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आगामी निवडणुकीत आम्ही पक्षाच्या आदेशाप्रमाणे काम करू.”
राजकीय वर्तुळात या भेटीला मोठे महत्त्व देण्यात येत असून, महायुतीची ‘इनडायरेक्ट कन्फर्मेशन’ म्हणून याकडे पाहिले जात आहे.