MH 13 news network
सोलापूर ः- सोलापूर त्वचारोगतज्ज्ञ संघटना व अखिल भारत त्वचारोगतज्ज्ञ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. 18 फेब्रुवारी 2024 रोजी सोलापुरात जनजागृती करण्यात येणार आहे. या अंतर्गत ‘‘स्कीन सफर रथा’’च्या माध्यमातून चित्रफितींद्वारे जनजागृती तसेच तज्ज्ञांचे मार्गदर्शन आदी कार्यक्रम घेण्यात येणार आहेत, अशी माहिती सोलापूर त्वचारोगतज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्षा डॉ. स्मिता चाकोते व सचिव डॉ. नागेश गड्डम यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
रविवार, 18 फेब्रुवारी रोजी पुण्याहून निघालेल्या स्कीन सफर रथाचे पाटस, मोहोळ मार्गे सकाळी 9.30 वाजता सोलापूरच्या शासकीय रुग्णालयाच्या आवारात आगमन होणार आहे. या रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागाच्या कॉरिडोरजवळ दिवसभर रथावर लावलेल्या एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून त्वचारोगबाबत माहिती देऊन जनजागृती केली जाणार आहे. सकाळी 10 ते 12 या दरम्यान शासकीय रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागाच्या रिसेप्शनसमोर तज्ज्ञ डॉक्टरांचे त्वचारोगबाबत मार्गदर्शन शिबिर होणार आहे. यावेळी शासकीय रुग्णालयाच्या प्रभारी अधिष्ठाता डॉ. तिरणकर, शासकीय रुग्णालयाच्या त्वचारोग विभागप्रमुख डॉ. स्मिता चाकोते, ज्येष्ठ त्वचारोगतज्ज्ञ डॉ. स्वप्नील शहा, डॉ. गिरीश काळे, डॉ. सचिन कोरे, डॉ. संतोष करादगे, डॉ. सुनील तावशीकर यांच्यासह सोलापुरातील नामवंत त्वचारोगतज्ज्ञांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
सायकल रॅलीचे आयोजन..
त्वचारोगाबाबत जनजागृती करण्यासाठी तसेच त्वचा, केस व नखांच्या समस्यांसाठी नोंदणीकृत पात्र त्वचारोग तज्ज्ञांकडून उपचार घेणे या मुख्य उद्देशाने पुण्याहून निघालेल्या सायकल रॅलीचे रविवार, 18 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सोलापुरात आगमन होणार आहे. पुण्यातील ज्येष्ठ त्वचारोगतज्ज्ञ डॉ. नरेंद्र पटवर्धन यांच्या नेतृत्वाखाली 15 डॉक्टरांची ही रॅली असणार आहे. सोलापुरात त्याचे स्वागत सोलापूर त्वचारोगतज्ज्ञ संघटनेकडून करण्यात येणार आहे. ही रॅली उमरगा, शहाबादमार्गे 21 फेब्रुवारीला हैदराबाद येथे पोहोचेल. तिथे त्वचारोगतज्ज्ञांची वार्षिक परिषद होणार आहे.
स्कीन सफर रथाच्या तसेच मार्गदर्शन शिबिराच्या माध्यमातून होणार्या जनजागृती कार्यक्रमांचा सोलापूरकरांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सोलापूर त्वचारोगतज्ज्ञ संघटनेतर्फे करण्यात आले आहे.
पत्रकार परिषदेला डॉ. स्वप्नील शहा व डॉ. सचिन कोरे उपस्थित होते