सोलापुरातील पिण्याचे पाणी व तरुणांच्या रोजगाराला सर्वोच्च प्राधान्य — अण्णा बनसोडे, विधानसभा उपाध्यक्ष
“सोलापूर महानगरपालिकेत ‘अबकी बार ७५ पार’ निश्चित”
सोलापूर (प्रतिनिधी) – “सोलापुरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसेच शहरातील तरुणांना नोकऱ्या उपलब्ध करून देणे हेच आमचे पहिले प्राधान्य आहे,” असे विधानसभेचे उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे यांनी सोलापूर दौऱ्याच्या निष्कर्षानंतर सांगितले.
गेल्या तीन दिवसांत २६ प्रभागांतील विविध बैठका, संवाद आणि कार्यक्रमांदरम्यान शहरातील नागरिकांनी पिण्याचे पाणी, रस्ते, गटारव्यवस्था, रोजगारअभाव, उद्योग नसल्यामुळे वाढलेली बेरोजगारी या गंभीर समस्या मांडल्या. या सर्व घडामोडींचा अहवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात येणार असल्याची माहिती बनसोडे यांनी दिली.
बीजेपीच्या कारभारावर टीका..
बनसोडे म्हणाले,“बीजेपीच्या सत्ताकाळात रोजंदारी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटले नाहीत, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम आहे. रोजगाराच्या संधी निर्माण करण्यातही अपयश आले. शहरात कचऱ्याचा प्रश्न गंभीर आहे.”या प्रमुख मुद्द्यांवर आगामी महापालिका निवडणूक राष्ट्रवादी पक्ष स्वबळावर लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

एमआयएम नगरसेवक राष्ट्रवादीत; आणखी दोघांशी संपर्क..
सोलापूरातील एमआयएमचे नऊ नगरसेवकांपैकी सहा आधीच राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत. उर्वरित तीन नगरसेवकांपैकी एकाशी बनसोडे यांनी भेट घेतली असून दोन नगरसेवकांशी संपर्क सुरू आहे.
“सोलापुरातील राजकीय समीकरणे राष्ट्रवादीच्या बाजूने झुकताना दिसतात,” असा दावा त्यांनी केला.
सोलापुराच्या विकासासाठी निधीची हमी..

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि एमआयएमच्या स्थानिक नेत्यांनी शहरातील विकासकामांसाठी निधी मागविला असून, त्याबाबत विशेष प्राधान्याने पाठपुरावा करू, असे बनसोडे यांनी सांगितले.
“अर्थमंत्री म्हणून अजितदादा पवार सोलापूरसाठी आवश्यक निधी देतील, याबाबत शंका नाही,” असे त्यांनी नमूद केले.
रोजगार आणि उद्योग क्षेत्राकडे दुर्लक्ष..
बनसोडे म्हणाले,“सोलापूर आयटी हब होणे अपेक्षित होते. कारखान्यांमध्ये तरुणांना नोकऱ्या मिळायला हव्या होत्या. परंतु पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी या दिशेने गंभीर प्रयत्न केलेले नाहीत.
”महापालिकेत मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा प्रश्न, रोजंदारी कर्मचाऱ्यांची अडचण या मुद्द्यांवरही ते बोलले.
प्रशासकांच्या काळात विकास मंदावतो..
राज्यातील २२ महानगरपालिकांमध्ये प्रशासक असल्याने स्थानिक पातळीवरील विकास ठप्प असल्याचे त्यांनी सांगितले.“स्थानिक समस्या लोकप्रतिनिधींनाच नीट माहिती असते. त्यामुळे निवडणुका होणे अत्यावश्यक आहे,” असे बनसोडे म्हणाले.
कार्यक्रमास मान्यवरांची उपस्थिती..
या पत्रकार परिषदेला संतोष पवार, जुबेर बागवान, किसन जाधव, आनंद चंदनशिवे, आनंद मुस्तारे, तौफिक शेख, नूतन गायकवाड, चित्रा कदम, प्रमोद भोसले आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादीचे कार्यालय स्वमालकीच्या जागेत..
सरकारी जागेऐवजी स्वमालकीच्या जागेत राष्ट्रवादीचे संपर्क कार्यालय उभारण्यासाठी प्रक्रिया सुरू असल्याचे बनसोडे यांनी सांगितले.“लवकरच सोलापुरात राष्ट्रवादीचे नवीन स्वमालकीचे कार्यालय दिसेल,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
Ajit Pawar
Sunil Tatkare
Aditi Tatkare
Anna bansode – अण्णा बनसोडे
Solapur Municipal Corporation, Solapur
Santosh Pawar – संतोष पवार








