सोलापूर, दि. १२ : सोलापूर-पुणे-मुंबई हवाई मार्ग पुन्हा वेग घेणार आहे. उडान योजनेच्या धर्तीवर एक वर्षासाठी प्रति आसन ३,२४० रुपये व्यावहारिक तूट निधी (व्हायअबिलिटी गॅप फंडिंग-व्हिजीएफ) देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अध्यक्षस्थानी होते.

केंद्र सरकारच्या “उडान” योजनेअंतर्गत सामान्य नागरिकांना परवडणारा विमानप्रवास उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे.
सोलापूर विमानतळावरही ही योजना लागू होणार असून, तोपर्यंत वर्षभरासाठी राज्य सरकारकडून १०० टक्के व्हिजीएफ स्वरूपात निधी दिला जाणार आहे. यामुळे सोलापूर-पुणे आणि सोलापूर-मुंबई विमानप्रवासाचा खर्च लक्षणीयरीत्या कमी होईल.
या निर्णयानुसार स्टार एअर कंपनीस दर आसनामागे ३,२४० रुपये अनुदान मिळेल. यासाठी १७ कोटी ९७ लाख ५५ हजार २०० रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. उडान योजना लागू झाल्यानंतर राज्य सरकारकडून देण्यात येणारा निधी थांबवून केंद्राच्या योजनेनुसार फक्त २० टक्के व्हिजीएफ दिला जाईल.