MH13NEWS
सोलापूर, ८ मे – सोलापूर शहरातील पवित्र आणि प्रसिद्ध धार्मिक स्थळ असलेल्या श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरातील तलाव पुन्हा एकदा दूषित पाण्यामुळे चर्चेत आला आहे. आज गुरुवारी सकाळी या तलावात चार ते पाच कासव मृतावस्थेत आढळून आले. काही दिवसांपूर्वीच तलावातील अनेक मासे मृतावस्थेत सापडल्याची घटना समोर आली होती.
पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांनी वेळोवेळी तलावाच्या स्वच्छतेबाबत प्रशासनाकडे मागणी केली आहे. तथापि, याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे तलावातील पाणी अत्यंत गढूळ, हिरवट आणि दूषित झाले आहे. याचा थेट परिणाम तलावातील जलसजीवांवर होत असल्याचे दिसून येते.

पत्रकार रणजीत वाघमारे यांनी मृत कासवांचे छायाचित्र काढून ही वस्तुस्थिती समाजासमोर आणली आहे. तलावाजवळ मॉर्निंग वॉकसाठी येणारे नागरिक देखील या परिस्थितीने त्रस्त झाले असून त्यांनी यापूर्वीही दुर्गंधी, मृत मासे आणि अस्वच्छतेबाबत तक्रारी केल्या आहेत.

कावळ्यांचे थवे मृत मासे उचलण्यासाठी तलावावर येतात, त्यामुळे मासे इकडे-तिकडे पडून दुर्गंधी पसरते. ही परिस्थिती ना केवळ पर्यावरणासाठी, तर सार्वजनिक आरोग्यासाठीही धोकादायक ठरत आहे.
पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने तातडीने लक्ष घालून तलावाची स्वच्छता करावी, जलपरीक्षण करावे आणि भविष्यातील अशा घटनांना आळा घालावा, अशी मागणी केली आहे.