विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर
मुंबई : जागतिकस्तरावर नव्या आर्थिक आणि राजकीय परिस्थितीत भारत-रशिया संबंधांना अतिशय महत्त्व आहे. विकास, तंत्रज्ञान, बाजारपेठ, सेवा, उद्योग, ऊर्जा, बांधकाम, वाहतूक, सांस्कृतिक आणि पर्यटन अशा अनेक क्षेत्रात सेंट पीटर्सबर्ग इंटरनॅशनल इकॉनॉमिक फोरम – २०२४ च्या माध्यमातून उद्योग-व्यापाराच्या विपुल संधी निर्माण होतील. महाराष्ट्र हे भारतातील औद्योगिक दृष्टीने अग्रगण्य राज्य असल्याने या व्यापारसंधी उभय देशांना लाभदायक ठरतील, यात मुंबईचे स्थान आणखी महत्त्वपूर्ण राहील, असे मत विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी सांगितले. ते रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्या संकल्पनेनुसार येथे आयोजित सेंट पिटर्सबर्ग इंटरनॅशनल इकॉनॉमिक फोरम – २०२४ मध्ये ‘रशिया – भारत’ या विषयावरील चर्चासत्रात बोलत होते. याप्रसंगी अन्य मान्यवर आंतरराष्ट्रीय वक्त्यांबरोबरच भारताचे रशियातील राजदूत विनयकुमार उपस्थित होते.
भारत-रशिया मैत्री संबंध हे काल कसोटीवर सिद्ध झालेले आणि परस्पर विश्वास, सहकार्य, सामंजस्य हा मुख्य आधार असलेले असे आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष माननीय श्री. पुतिन आणि देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यातील परस्पर स्नेहसंबंध हे नेहमीच जागतिक शांतता आणि विकास यांना प्राधान्य देणारे ठरले आहेत. या फोरममुळे जागतिकस्तरावर सशक्त यंत्रणा उभी राहिली आहे ज्यातील सत्रात मला निमंत्रित करण्यात आले हा माझा बहुमान समजतो, असे यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. श्री.नार्वेकर म्हणाले.
रशियन नवउद्यमींना भारतातील सतत विस्तारणाऱ्या व्यापार आणि उद्योग क्षेत्राचे आकर्षण आहे. त्याचप्रमाणे भारतातील उद्योजकांना देखील रशियातील उद्योग विस्ताराच्या संधी खुणावत आहेत. या फोरमच्या माध्यमातून दोन्हीकडील उद्योजकांना त्यासाठी उचित मार्गदर्शनाचा लाभ मिळावा. उभयपक्षी व्यापार हा २०२५ पर्यत आणखी पुढचे उद्दिष्ट गाठेल, असे संकेत दिसत आहेत, असेही विधानसभा अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांनी यावेळी सांगितले.