मुंबई : उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने वरळी येथील सासमीरा मार्गावरील सफेलो हॉटेल समोर आणि लोखंडवाला कॉम्लेक्स, अंधेरी (प) या ठिकाणी परदेशात निर्मित केलेली व दिल्लीतून आयात करुन मुंबईत आणलेल्या विविध ब्रँन्डच्या विदेशी मद्याचा साठा चारचाकी वाहनासह जप्त केला आहे. हा मुद्देमाल एकूण 37 लाख 28 हजार 560 रूपये किंमतीचा दारूबंदी गुन्ह्यातील आहे.
लोखंडवाला कॉम्लेक्स येथील गुन्ह्यात 14 लाख 39 हजार 160 रूपये व वरळी येथील सफेलो हॉटेल समोर येथील गुन्ह्यात 22 लाख 89 हजार 400 रूपये किंमतीचा दारुबंदी गुन्ह्यातील मुद्देमालाचा समावेश आहे. या गुन्ह्यापोटी सतीश शिवलाल पटेल (वय 35) या इसमास ताब्यात घेण्यात आले आहे. इसमाने गुन्ह्याची कबुली दिल्यामुळे आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 चे विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. उत्पादन शुल्क विभागाने यापूर्वीदेखील परदेशातून, दिल्लीतून महाराष्ट्रात आयात केलेल्या विविध बँन्डच्या विदेशी स्कॉच मद्याच्या सिलबंद बाटल्यांची मुंबईमध्ये विक्री करणाऱ्या इसमावर गुन्हे नोंद केले आहेत.
राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, संचालक प्रसाद सुर्वे, कोकण विभागीय उप आयुक्त प्रदीप पवार, मुंबई शहर अधीक्षक प्रविण कुमार तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच लोकसभा निवडणूक आचारसंहितेचे गांभीर्य लक्षात घेता उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकांनी ही कारवाई केली आहे. ही कारवाई निरीक्षक प्रकाश काळे यांनी केली असून दुय्यम निरीक्षक प्रज्ञा राणे, दुय्यम निरीक्षक लक्ष्मण लांघी तसेच जवान विनोद अहीरे यांनी सहकार्य केले. गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक श्री. काळे करीत आहेत, असे कोकण उपआयुक्त प्रदीप पवार यांनी कळविले आहे.