मुंबई : “लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ मध्ये लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन मुंबई शहरातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. त्यासाठी विविध उपक्रम राबवावेत”, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. संजय यादव यांनी दिले.
भारत निवडणूक आयोग यांच्या सूचनेप्रमाणे जिल्हा स्वीप समिती गठित करण्यात आली आहे. या समितीची बैठक मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच घेण्यात आली. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी समितीच्या सदस्यांनी सदर निर्देश दिले.
या बैठकीत श्री. यादव म्हणाले की, “सर्व शासकीय विभागांनी एकत्र येऊन निवडणुकीत अधिकाधिक मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रवृत्त करावे, विविध माध्यमांतून मतदान जनजागृतीपर विशेष मोहिम राबवावी. तसेच मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या उद्दिष्ट्यपूर्तीसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. लोकसभा निवडणूकीसाठी जास्तीत – जास्त नवमतदार नोंदणी करुन लोकशाहीच्या या सर्वांत मोठ्या उत्सवामध्ये सहभागी करून घ्यावे. नागरिकांना मतदारयादीमध्ये नाव नोंदविण्याची संधी अजूनही आहे, मतदारांनी मतदारयादीत आपले नाव तपासून घ्यावे आणि आपले नाव नसेल तर मतदारनोंदणीसाठी voters.eci.gov.in या संकेतस्थळावर किंवा Voter Helpline Mobile App वर तसेच मतदार मदत क्रमांक १९५० यावर संपर्क करावा.
तसेच याबाबत काही अडचणी येत असतील, तर मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे मतदारांसाठी मतदार हेल्पलाइन क्रमांक ०२२-२०८२-२६९३ सुरू करण्यात आला आहे. मतदारांनी या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. संजय यादव केले.
श्री. यादव म्हणाले की, समितीच्या सदस्यांनी स्वतःसह कुटुंबियांनाही मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करावे. परिसरातील इतर नागरिकांनाही मतदान करण्याचे आवाहन करावे. तसेच मतदानाच्या दिवशी शासनाने दिलेल्या सवलतीचा लाभ घेत मतदारांनी आवर्जून मतदान करावे. यावेळी जिल्हाधिकारी श्री. संजय यादव यांनी स्वीप समितीच्या सदस्यांना मतदानाचा हक्क बजावण्याबाबत शपथ दिली.
या बैठकीला अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा प्रमुख समन्वय अधिकारी (स्वीप) फरोग मुकादम, उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्यामसुंदर सुरवसे यांच्यासह समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.
या बैठकीला पोलिस, सार्वजनिक बांधकाम विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई विद्यापीठ, स्वयंसेवी संस्था, नशामुक्ती विभाग, समाजकल्याण व कामगार विभाग, राष्ट्रीय छात्र सेना, नेहरु युवा केंद्र व प्रसारमाध्यम कक्ष अशा विविध शासकीय विभागांचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते.