MH13NEWS network
विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल
एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठामध्ये ‘संवेद २०२६’ स्मार्ट गव्हर्नन्स हॅकाथॉनचा यशस्वी समारोप
सोलापूर, १६ एप्रिल: “संवेद २०२६ या स्मार्ट गव्हर्नन्स हॅकाथॉनमधून आम्हाला शहरातील नागरी समस्यांवर अनेक अभिनव आणि व्यवहार्य उपाय मिळाले आहेत. या कल्पनांची अंमलबजावणी करून शहरातील सेवा अधिक सक्षम करण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ.” असे विचार सोलापूरचे महापौर विनायक कोंडयाल यांनी व्यक्त केले. एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठामध्ये सोलापूर महानगरपालिकेच्या सहकार्याने आयोजित ‘संवेद २०२६’ या स्मार्ट गव्हर्नन्स हॅकाथॉनमधील अंतिम प्रकल्पांचे प्रदर्शन व पारितोषिक वितरण समारंभाच्या प्रसंगी ते बोलत होते. एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठामध्ये आयोजित या राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमात देशभरातील उच्च शिक्षण संस्था, महाविद्यालये आणि विद्यापीठांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यानिमित्ताने सोलापूर शहरातील नागरी समस्यांवर नाविन्यपूर्ण उपाय शोधण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले. हॅकाथॉनमधील अंतिम फेरीतील संघांनी १५ एप्रिल रोजी आपले प्रकल्प सादर केले, तर १६ एप्रिल रोजी विद्यापीठ परिसरात प्रकल्पांचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले. आज या प्रदर्शनाचे उद्घाटन आणि त्यानंतर पारितोषिक वितरण समारंभ सोलापूरचे माननीय महापौर विनायक कोंडयाल, सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, मा. अच्युत गोडबोले, प्रा. कृष्णा वेदुला, प्रा. विल्यम ओक्स, एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. गोपाळकृष्ण जोशी आणि संचालक राघवेंद्र एम. चाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी बोलताना महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे म्हणाले “महानगरपालिकेच्या वतीने आम्ही विद्यार्थ्यांनी शहरातील नागरी समस्यांवर सुचवेलेल्या उपाययोजना आणि संकल्पनांचे स्वागत करतो. पुढील सहा महिने ते एका वर्षाच्या कालावधीत त्यांचा पाठपुरावा करून प्रत्यक्ष क्षेत्रीय प्रकल्पांमध्ये रूपांतर करण्यास आम्ही उत्सुक आहोत. यासाठी आम्ही आवश्यक ते आर्थिक, पायाभूत आणि मनुष्यबळाचे साहाय्य देण्यात येईल. तसेच विद्यार्थ्यांना सहा महिन्यांच्या इंटर्नशिपची संधी देखील उपलब्ध करून देऊ.”





एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. गोपाळकृष्ण जोशी म्हणाले, “विद्यापीठ म्हणून आम्ही विद्यार्थ्यांना समस्या-निवारक म्हणून घडवण्यासाठी कटिबद्ध आहोत. ‘हॅकाथॉन’ हा आजच्या जेन-झी’ला (Gen Z) समस्या सोडवण्याच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचा एक अत्यंत प्रभावी मार्ग आहे. या हॅकाथॉनमध्ये विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या उपायांची गुणवत्ता आणि नाविन्यता अत्यंत उल्लेखनीय आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये तांत्रिक कौशल्यांसोबत, प्रत्यक्ष समस्या समस्यांवर उपाय शोधण्याचा दृष्टीकोण विकसित होत आहे.” या कार्यक्रमास महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांच्यासह इतर प्रशासकीय अधिकारी, विद्यापीठाचे कुलसचिव प्राणेश मुरनाळ, डॉ. प्रभा कसलीवाल, डॉ. दर्शन रुईकर, डॉ. आनंद शिंपी उपस्थित होते. याशिवाय सोलापूर मधील औद्योगिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, देशाच्या विविध राज्यातील शिक्षण संस्थांमधील सहभागी संघांचे विद्यार्थी व त्यांचे मार्गदर्शक तसेच एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठातील अधिष्ठाता, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या हॅकाथॉनमध्ये सोलापूर महानगरपालिकेने शहरातील वाहतूक व पार्किंग व्यवस्थापन, रस्त्यांची स्थिती, पाणी वितरण, स्वच्छता कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि डेटा-आधारित सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापन अशा महत्त्वाच्या नागरी समस्यांचा समावेश केला होता. विद्यार्थ्यांनी या समस्यांवर तंत्रज्ञानाधारित, व्यवहार्य आणि प्रभावी उपाय सादर करून आपल्या कौशल्याचा ठसा उमटवला. या उपक्रमात देशातील १० राज्यांमधून २७०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून, एकूण ५४६ संघांनी नोंदणी केली. तज्ञांच्या मूल्यमापनानंतर ७५ संघांची निवड करण्यात आली व त्यांना मार्गदर्शनासह प्रोटोटाइप विकसित करण्याची संधी देण्यात आली. अंतिम फेरीत २५ उत्कृष्ट संघांनी प्रवेश मिळवला.
या हॅकाथॉनमध्ये बंगळुरू येथील आर.व्ही कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या ‘टीम अॅक्वाबाइटने’ प्रथम तर नवी मुंबई येथील एसआयइएस ग्रॅजुएट स्कूल ऑफ टेक्नॉलजीच्या ‘टीम सुपरनोवा’ यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. प्रथम विजेत्यांना रुपये दोन लाख (₹२,००,०००) आणि द्वितीय क्रमांकासाठी एक लाख रुपयांचे (₹१,००,०००) रोख पारितोषिक प्रशस्तिपत्रकासह देण्यात आले. तसेच नवी मुंबई येथील फ्रां.सी. रोड्रिग्स इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची ‘टीम आयओटीयन्स’, एनआयआयटी राजस्थानची ‘टीम किलोबाईट’ आणि हुबळी येथील केएलई टेक्नॉलॉजीकल यूनिवर्सिटीची ‘टीम हायड्रो-ऑप्स’ या तीन संघांना प्रत्येकी पन्नास हजारांचे (₹५०,०००) उत्तेजनार्थ पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. याशिवाय रुपये पंचवीस हजारांचे स्पेशल ज्यूरी अवॉर्ड हुबळी येथील केएलई टेक्नॉलॉजीकल यूनिवर्सिटीच्या ‘टीम गॉड-डॅम’ला देण्यात आले.
या हॅकाथॉनचे वैशिष्ट्य म्हणजे विविध शाखांतील विद्यार्थ्यांचा आंतरशाखीय सहभाग, शैक्षणिक व औद्योगिक तज्ज्ञांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष नागरी समस्यांवर आधारित आव्हाने. MathWorks तज्ज्ञांकडून आयोजित MATLAB कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यात आणि प्रोटोटाइप विकासात लक्षणीय वाढ झाली. संवेद २०२६ हा उपक्रम शासन, शिक्षण आणि उद्योग यांच्यातील प्रभावी समन्वयाचे उदाहरण ठरला असून, विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांमधून स्मार्ट आणि शाश्वत शहरी विकासाला नवी दिशा मिळाली आहे.







