MH 13NEWS NETWORK
सद्यस्थितीत सोलापूर विधानसभा मतदारसंघातील मध्य आणि दक्षिण हे सतत चर्चेतले असून निवडून कोण येईल यापेक्षा तिकीट कुणाला मिळेल.! याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मध्य मतदार संघासाठी मुस्लिम समाजातील चर्चेतला एक चेहरा शुक्रवारी थेट अंतरवाली सराटीत मध्ये गेला आणि शिष्टमंडळासह त्यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली.
मध्य विधानसभा मतदारसंघ हा विद्यमान खासदार प्रणिती शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. या भागात पद्मशाली आणि मुस्लिम समाजाची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. हिंदू बहुल आणि मुस्लिम बहुल असणारा या मतदारसंघात उमेदवारी मिळण्यासाठी शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे नेते मतीन बागवान यांनी शुक्रवारी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटीत भेट घेतली. त्यावेळी त्यांच्यासोबत मराठा समाजाचे माऊली पवार,राजन जाधव, प्रा. गणेश देशमुख,डॉ. प्रमोद पाटील, ॲड.श्रीरंग लाळे ,दाजी काकडे,बाळासाहेब गायकवाड आदी उपस्थित होते.
मतीन बागवान यांनी वेळोवेळी मराठा आंदोलनामध्ये सक्रिय आणि जाहीर सहभाग नोंदवला आहे. बागवान यांचा मराठा समाजामध्ये मोठा वावर आहे. त्यासोबत मुस्लिम समाजातील एक संवेदनशील नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. ते बाजार समितीतील एक प्रसिद्ध व्यापारी आहेत.
लढायचं की पाडायचं..!
मनोज जरांगे पाटील यांनी नुकतीच आपली भूमिका स्पष्ट केली असून काही ठिकाणी ते उमेदवार उभे करणार आहेत तर काही ठिकाणी उमेदवार पाडण्याचे काम करायचे संकेत दिले आहेत. तसेच जिथे एससी आणि एसटीचा उमेदवार असेल त्या ठिकाणी उमेदवार उभा करायचा नाही हे स्पष्ट केले आहे.
याच पार्श्वभूमीवर हजारो इच्छुकांनी जरांगे पाटलांची भेट घेऊन विविध मतदार संघात उमेदवारी देण्यासाठी मागणी केली आहे. मध्य मधून मतीन बागवान यांच्या उमेदवारी बाबत मराठा समाजातील काही नेते मंडळींनी पुढाकार घेतला आहे. जरांगे पाटलांकडे याबाबतचा कार्य अहवाल देण्यात करण्यात आला आहे.