MH 13 NEWS NETWORK
व्याख्याने, परिसंवाद अन् सांस्कृतिक कार्यक्रमांनी गाजला दुसरा दिवस
सोलापूर : प्रतिनिधी
‘कृषी संस्कृती हा मानवी जीवन विकासाचा आत्मा आहे. त्यामुळे कृषी संस्कृती अंगीकारू या ‘ असा निर्धार करत दोन दिवसीय कृषी संस्कृती कार्यशाळेचा मंगळवारी समारोप झाला. महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात ही दोन दिवसीय कृषी संस्कृती कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली.

कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात ज्येष्ठ अभ्यासक डॉ. विश्वनाथ शिंदे यांचे ‘कृषी संस्कृती आणि जत्रा यात्रा’ या विषयावर व्याख्यान झाले. लोक परंपरेत सणांचे महत्त्व अधिक असून कृषी संस्कृती आणि सण यांच्या मिलाफाने महाराष्ट्राचे लोकजीवन समृद्ध होत गेले, असे डॉ. शिंदे यांनी सांगितले. दुसऱ्या सत्रात लोकसंस्कृतीचे अभ्यासक व लेखक मुकुंद कुळे, चित्रपट दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांच्याशी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांच्या गप्पांचा कार्यक्रम झाला. कृषी संस्कृती साहित्य संबंधी म्हणी, उखाणे, वाक्यप्रचार, काव्य तसेच चित्रपट माध्यमांमधील कृषी संस्कृतीचे महत्त्व व अस्तित्व या विषयावर रंगलेल्या अभ्यासपूर्ण गप्पांचा अनुभव सोलापूरकरांनी घेतला. दिग्दर्शक गजेंद्र अहिरे म्हणाले, कृषी संस्कृतीशिवाय चित्रपट माध्यमांनाच नव्हे तर एकूणच लोकजीवनाला पर्याय नाही. मनोरंजनाच्या माध्यमातून सर्वच क्षेत्रात पुन्हा कृषी संस्कृती येणे ही काळाची गरज बनली आहे.
इंद्रजीत भालेराव यांनी ‘शोध कृषी संस्कृतीचा’ या विषयावर विस्तृत विवेचन केले. वेद, ज्ञानेश्वरी, भगवान गौतम बुद्धांचा काळ, चक्रधर स्वामींचे साहित्य अशा अनेक साहित्यांमध्ये कृषी संस्कृतीची मांडणी झाली आहे याकडे इंद्रजीत भालेराव यांनी लक्ष वेधले. त्यांनी सादर केलेल्या ‘चल माझ्या दोस्ता’ या कवितेला सोलापूरकरांनी प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
संजय बाविस्कर यांनी ‘कृषी परंपरेचे घटक’ या विषयावर व्याख्यान दिले. तर ‘कृषी संस्कृतीवर आधुनिकीकरणाचा परिणाम’ या विषयावरील परिसंवादात डॉ. अजित देशपांडे, डॉ. सचिन फुगे, सुप्रिया महेंद्रकर यांनी आपली मते मांडली. ‘ कला’ या विषयावरील कार्यशाळेत संध्या मोहिते आणि निखिल परमेश्वर यांनी मांडणी केली.
सांस्कृतिक कार्यक्रमात नेहा रार्चला आणि सहकाऱ्यांनी सादर केलेला नृत्य अविष्कार रसिकांना भावला. स्वप्निल सपना लोककला विकास मंडळाने लोकसंगीतावर आधारित पारंपारिक वाद्यांचे वादन, गीते, लावण्या, लोकनृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
या कार्यक्रमाचे शोभा बोल्ली यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. सुवर्णा पापळ यांनी संपूर्ण कार्यशाळेचा समन्वय उत्तम साधला. या कार्यशाळेसाठी स्थानिक सहसमन्वयक रवी सोलापुरे यांनी सहकार्य केले. त्याशिवाय अमोल धाबले यांनीही यासाठी परिश्रम घेतले