MH 13 NEWS NETWORK
सोलापूर महापालिकेत प्रशासक राज असून क्वचितच या ठिकाणी लोकप्रतिनिधी येतात. जवळपास तीन वर्षापासून नगरसेवक पद नसल्यामुळे अनेक माजी नगरसेवक मनपात फिरताना दिसत नाहीत. आजच्या एक एप्रिल दिवशी दुपारी दक्षिणचे भाजपचे आमदार, आणि सायंकाळी उत्तरचे आमदार महापालिकेत आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या मात्र दोन्ही आमदारांचे विषय हे वेगळे होते. त्या दिवशीच एप्रिल फूल बनाया..! या विषयावर चार हुतात्मा चौकात संभाजी ब्रिगेडच्या वतीने फलक दाखवून आंदोलन करण्यात आले.
आज दुपारी दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांनी मतदारसंघात काही भागात पाणीपुरवठा पाच ते सहा दिवसात होत आहे.तो तीन दिवसात करता येईल का.? यावर आराखडा तयार करावा,जुन्या पाईपलाईन काढून नवीन टाकायचा प्रस्ताव, झोपडपट्टी भागात अंगणवाडीची प्रलंबित कामे, प्राणी संग्रहालय सुंदरम नगर येथील जलतरण तलाव याबाबत महापालिका आयुक्त्यांशी भेट घेऊन चर्चा केली आणि त्यांना सूचना दिल्या.
जवळपास 20 विविध विषयांवर त्यांची प्रदीर्घ चर्चा झाली. यावर महापालिका आयुक्तांनी येत्या तीन महिन्यात मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले असल्याचे आमदार देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते.
दरम्यान, बाजार समिती निवडणुकीमध्ये जे येतील त्यांना सोबत घेऊ, जे नाहीत त्यांच्या विरोधात लढू अशी भूमिका मांडली. त्यामुळे पक्षातील नेत्यांमध्ये सारे काही आलबेल नाही, हे दिसून आले.
गेल्या वेळी पक्षातील लोक विरोधात होतेच पण त्यांचा विचार न करता स्वतंत्रपणे बाजार समिती निवडणूक लढली, डीसीसी बँक निवडणूक एकट्याने लढली हे सांगायला ते विसरले नाहीत.
उड्डाणपुलाच्या कामाला लागणार मुहूर्त..!

दुसरीकडे उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी महापालिका आयुक्तांसोबत आयोजित केलेल्या बैठकीत उड्डाणपुलाचे काम अजूनही पेंडिंग असल्याचे सांगितले. छत्रपती संभाजी महाराज चौक ते पत्रकार भवन उड्डाणपुलाचे 15 एप्रिल पर्यंत जागेचे हस्तांतरण महापालिकेकडून करण्यात येणार आहे. जुना बोरामणी नाका ते पत्रकार भवन या पर्यंत उड्डाणपुलाचे 15 मे पर्यंत हस्तांतरण करण्यात येणार आहे, त्यानंतर नॅशनल हायवे कडून दोन महिन्यात निविदा प्रक्रिया राबवून प्रत्यक्षात काम सुरू करण्याबाबत आमदार देशमुख यांनी अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.यावेळी
यावेळी नॅशनल हायवे अधिकारी, नगर रचना विभाग अधिकारी, भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे, उपाध्यक्ष अनंत जाधव, राजाभाऊ काकडे उपस्थित होते.
दहा वर्षापासून चर्चेतला उड्डाणपूल..! सत्यात कधी?
शहरातील वाढलेली वाहनांची संख्या, वाहतूक, अपघातांचे प्रमाण, जड वाहतुकीला बळी पडणारे निष्पाप नागरिक यामुळे साधारण 2013 ते 2014 या काळात उड्डाणपुलाची गरज आणि संकल्पना निर्माण झाली.
त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले त्यामध्ये शहरातील उड्डाणपूल बांधणी योजनेचा समावेश होता.
मंत्री नितीन गडकरी यांच्या सोलापूर दौऱ्यात उड्डाणपूलांसाठी निधीची तरतूद करण्यात आली होती.
त्यानंतर उड्डाणपूला साठी आवश्यक असणारी हस्तांतरण प्रक्रिया कोर्टात गेल्याने पुन्हा काम रखडले.
महापालिका आयुक्त, नॅशनल हायवे अधिकारी, नगररचना विभाग अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्यात सुसंवाद नसल्यामुळे आणि हस्तांतरण प्रक्रिया रेंगाळल्यामुळे तब्बल दहा वर्षापासून उड्डाणपूलाचे काम रखडलेले असल्याची टीका मोठ्या प्रमाणावर केली जाते.
अनेक निष्पाप वाहनधारकांचे बळी घेणाऱ्या जड वाहतुकीवर रामबाण उपाय असलेल्या उड्डाणपुलाचे स्वप्न सत्यात येणार का? का पुन्हा एप्रिल फुल होणार..? याबाबत सामाजिक संघटनांनी शंका व्यक्त केली आहे.
सोलापूरची जनता सोशिक आहे..! एप्रिल फूल बनाया…!

सोलापूरची जनता सोशिक असून अनेक समस्या नागरिकांसमोर आहेत मात्र त्या पूर्ण करण्यात लोकप्रतिनिधी सपशेल अपयशी ठरले असून त्याचा निषेध करण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने चार हुतात्मा चौकात फलक दाखवून आंदोलन करण्यात आले.
यावेळी महिलांनी मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी केली. स्वच्छतागृह, विमानतळ, पाणी प्रश्न, एम आर आय मशीन, उड्डाणपूल समस्या, जड वाहतूक, बंद असलेला जलतरण तलाव, ठप्प असणारी परिवहन सेवा, अतिक्रमण, मोठे उद्योग धंदे नाहीत, बहुतांशी उद्याने बंद, स्मार्ट टॉयलेट नावालाच…! याबाबतचे फलक दाखवून आंदोलन करण्यात आले.