mh 13 news network
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६४ वा दीक्षान्त समारंभ संपन्न
छत्रपती संभाजीनगर, दि.१३ : मराठवाड्याच्या अत्यंत वैभवशाली व प्राचीन परंपरांचा वारसा पुढे नेण्याचे काम डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या माध्यमातून होत आहे. ’विकसीत भारत’चे ध्येय आपणास साकार करावयाचे असेल तर आगामी दहा वर्षात देशातील ’टॉप ५०’ विद्यापीठामध्ये क्रमांक मिळविण्याचे ध्येय समोर ठेवून काम करा, असे आवाहन कुलपती तथा राज्यपाल रमेश बैस यांनी केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६४ वा दीक्षांत समारंभ कुलपती तथा राज्यपाल रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली व ’एनसीएल’चे संचालक डॉ.अशिष लेले यांच्या प्रमुख आज थाटात संपन्न झाला. कुलपती रमेश बैस हे ’राजभवना’तून य सोहळ्यात दूरदृष्यप्रणालीद्वारे सहभागी झाले.
आज सकाळी १० वाजता या सोहळ्याचे आयोजन विद्यापीठाच्या नाट्यगृहात करण्यात आले होते. कुलगुरु डॉ.विजय फुलारी, प्र कुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर, परीक्षा व मुल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ.भारती गवळी, प्रभारी वित्त व लेखाधिकारी डॉ.संजय कवडे, अधिष्ठाता डॉ.एम.डी.शिरसाठ, डॉ.संजय साळुंके, डॉ.वैशाली खापर्डे, डॉ.बीना हुबे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.गजानन सानप, काशिनाथ देवधर, डॉ.भगवान साखळे, प्राचार्य डॉ.भारत खंदारे, डॉ.रविकिरण सावंत, डॉ.अंकुश कदम, नितीन जाधव, डॉ.योगिता होके पाटील, अॅड.दत्तात्रय भांगे, डॉ.व्यंकट लांब, डॉ.अपर्णा पाटील आदी उपस्थित होते.
याप्रसंगी ऑक्टोबर/ नोव्हेंबर २०२२ व मार्च-एप्रिल २०२३ मध्ये उत्तीर्ण झालेल्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांना तसेच २७ जून २०२३ ते आजतागायत पीएच.डी प्राप्त १३९ संशोधकांना पदव्यांचे वितरण करण्यात आले.
शोधा म्हणजे सापडेल – डॉ.अशिष लेले
एका बाजूला ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे जगामध्ये प्रचंड बदल झाले आहेत. तथापि आजच्या जगात अनेक प्रकारची गुंतागुंत असून विविध प्रश्नही निर्माण झाले आहेत. सर्व प्रश्नांवर उत्तरे शोधण्याचे आणि नवी दिना देण्याचे काम तरुण्यांचे आहे. आपल्यासाठी संधीचे एक दार बंद झाले तर दुसरे उघडायचे असते. एक रस्ता बंद झाला असेल तर दुसरा नवा ’पथ’ शोधून ध्ययेपूर्ती करायची असते. आयुष्यात ’पर्पज’, ’प्रिजव्र्हन्स’ व ’पॅशन’ हे तीन ’पी’ महत्त्वाचे आहेत, याची जाणीव ठेवा, असे आवाहनही ’एनसीएल’चे संचालक डॉ.अशिष लेले यांनी केले.
समाजाभिमुख संशोधनास प्राधान्य – कुलगुरू
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे ‘फर्स्ट जनरेशन ग्रॅज्युटस्’ घडविणारे विद्यापीठ म्हणून ओळखले जाते. पारदर्शक प्रशासन, उच्च शैक्षणिक दर्जा, समाजाभिमुख संशोधन यासाठी विद्यार्थी हिताच्या दृष्टीने विद्यापीठाने काही महत्त्वाची पावले उचलली आहेत. नवीन शैक्षणिक धोरणात अपेक्षित असलेला ‘आंतर विद्या शाखीय दृष्टीकोन’ समोर ठेऊन आम्ही अध्ययन, संशोधनावर दिला आहे.केंद्र शासनाने प्रधानमंत्री उच्चस्तर शिक्षा अभियान अर्थात पीएम उषा प्रकल्पातंर्गत शंभर कोटींचा निधी घोषित केला आहे. अत्यन्त उत्तम रितीने आम्ही हा प्रकल्प राबविणार आहोत. शिक्षणासोबतच संशोधन हेही महत्त्वाचे आहे. विद्यापीठाने ’रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट सेल’ स्थापन केला असून ‘संशोधन व नवोन्मेष’ समाजपयोगी असावे या हेतून संशोधन प्रकल्प राबविण्यात आले.विद्यापीठ निधीतून हा महत्वाकांक्षी प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. चालू शैक्षणिक वर्षात केमिकल टेक्नॉलॉजी या विभागाने ‘एनबीए’चे मानांकन मिळविले आहे. या सर्व सकारात्मक बाबी समोर ठेऊन विद्यापीठाने प्रगतीच्या दिशेने ‘टेकऑफ’ घेतला आहे, असे कुलगुरू डॉ विजय फुलारी स्वागतपर भाषणात म्हणाले.
पदव्यांचे वाचन अधिष्ठाता डॉ.महेंद्र शिरसाठ, डॉ.संजय साळुंके, डॉ.वैशाली खापर्डे व डॉ.वीना हुंबे यांनी केले. परीक्षा मंडळ संचालक डॉ.भारती गवळी यांनी पीएच.डी धारकांच्या यादीचे वाचन केले. सूत्रसंचालन डॉ.मुस्तजिब खान व प्रा.पराग हासे यांनी केले. कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर यांनी आभार मानले. या सोहळ्याचे विद्यापीठाच्या संकेतस्थळावरुन थेट प्रक्षेपण करण्यात आले.