महेश हणमे / 9890440480
आजच्या पत्रकार परिषदेत मांडणार भूमिका..!
संपूर्ण राज्यात मराठा आरक्षणासाठी खंबीरपणे लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी 24 मार्च रोजी महाबैठकीत आपली भूमिका जाहीर केली. त्यानुसार आज 30 मार्च रोजी अंतरवाली सराटी या ठिकाणी शेकडो इच्छुक उमेदवार आणि प्रमुख मराठा समन्वयकांची गर्दी झाली आहे. गावागावात जाऊन समाज मतांचा, बैठकींचा अहवाल आणि इच्छुकांच्या अर्जाची छाननी या ठिकाणी खुद्द मनोज जरांगे पाटील करत असून आज सायंकाळी पाच वाजता पत्रकार परिषदेमधून आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.
अंतरवाली सराटी या ठिकाणी पुण्यातील माजी मनसे नेते वसंत मोरे, अर्चना शहा हे आपल्या काही समर्थकांसह दाखल झाले असून जरांगे पाटील यांच्या सोबत त्यांची भेट साधारण साडेपाच वाजता होणार असल्याचं समजत आहे. हे दोन उमेदवार लोकसभेसाठी इच्छुक उमेदवार असून पाटील यांच्या भेटीला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.
अंतरवाली सराटी या ठिकाणी जरांगे पाटील स्वतः अर्जाची छाननी करत आहेत. त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या अर्जांवर टिपणी लिहिण्याचे काम सुरू आहे.
मराठा आरक्षण आंदोलनात सहभागी असलेल्या मराठ्यांचे अंतरवाली सराटी हे केंद्रबिंदू झाले असून आजच्या जरांगे पाटील यांच्या पत्रकार परिषदेतील भूमिकेनंतर लोकसभा निवडणुकीत मराठा समाज नेमकी काय भूमिका घेणार हे स्पष्ट होणार आहे.
जरांगे पाटील यांच्या भूमिकेकडे सत्ताधारी पक्ष ,विरोधी पक्ष आणि मराठा समाजाचे समर्थन घेऊन निवडणुकीसाठी उभे राहणारे इच्छुक उमेदवार यांचे लक्ष लागले आहे.