महेश हणमे / 9890440480
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या मराठा समाजाच्या नेत्याकडे पर्यायाने केंद्रबिंदू ठरलेल्या अंतरवाली सराटीकडे आजच्या मनोज जरांगे पाटील यांच्या निर्णयाकडे सत्ताधारी पक्ष, विरोधक तसेच इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागून राहिले होते. जरांगे पाटील यांनी अपक्ष उमेदवार उभे न करण्याचा मोठा निर्णय घेतलाय. त्याच सोबत मराठा समाजाने त्यांना योग्य वाटेल तो निर्णय घ्यावा. ज्यांना पाडायचे असेल त्यांना पाडा परंतु ज्यांनी 50% च्या आतून ओबीसी आरक्षणासाठी तसेच सगेसोयरे अध्यादेशासाठी सकारात्मक भूमिका घेतलेली आहे. त्यांना सहकार्य करावे अशी साद मराठा समाजाला घातली आहे.
वाचा… जरांगे पाटील काय म्हणाले..!
मी समाजाची राख रांगोळी करू शकत नाही. माझ्यासाठी आरक्षण हे महत्त्वाचे असून मराठ्यांच्या रक्तात राजकारण भिनलेले आहे, याची प्रचिती मागील पाच ते सहा दिवसात मला आली. अनेक जणांनी घरोघरी जाऊन फॉर्म भरून घेतले. अनेकांनी ज्यांच्याकडे राजकीय सत्ता आहे त्यांच्या मंगल कार्यालय, कार्यालय, घराजवळ गाव बैठका घेतल्या. याची पूर्ण माहिती माझ्याकडे आली आहे.
सर्वसामान्य गावाकडचा,खेडेगावचा मराठा मतदार हा माझा खरा मतदार असून त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही सक्षम ठरला नाही. हे माझ्या लक्षात आले असून मी समाजाची राख रांगोळी करू शकत नाही. ज्यांना करायचे असेल त्यांनी ती करावी. परंतु, मी माझ्या निर्णयाला ठाम आहे. कोणत्याच प्रकारे मी अपक्ष उमेदवार उभा करणार नाही, तसेच 500 किंवा 1000 उमेदवार उभे करून समाजाचं नुकसान होऊ देणार नाही. मराठा आरक्षण मिळवून देण्यासाठी मी इंचभर सुध्दा मागे हटणार नाही.
येणाऱ्या आगामी विधानसभेकडे मराठा समाजातील होतकरू तरुणांनी लक्ष देणे गरजेचे आहे. सगे सोयऱ्यांचे आरक्षण मिळवणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे .मी समाजाचा मालक नसून मराठा समाज माझा मालक आहे.
येणाऱ्या विधानसभेत चळवळीतील मराठा समाजातील अधिकाधिक तरुण विधानसभेत पाठवले जातील. त्यासाठी तयारी करण्यासाठी सहा महिन्याचा कालावधी मिळाला आहे. मी सर्व आंदोलनातील तरुणांना, गोरगरीब मराठ्यांना आवाहन करतो की त्यांनी विधानसभेसाठी सर्वसामान्य खेड्यातील सर्व मराठा समाजाकडे पोहोचावे.अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी आज 30 मार्च रोजी अंतरवाली सराटी येथील उपोषण स्थळी व्यक्त केली.
मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेकडे राज्याचे लक्ष लागून राहिल्याची भावना राजकीय वर्तुळात सुरू होती. समाज माध्यमांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा सुरू होत्या त्यास जरांगे पाटलांच्या भूमिकेमुळे पूर्णविराम मिळाला आहे.