MH 13 News network
सोलापूर, दि. ७ —आरबळी (ता. मोहोळ) येथे ७४ वर्षीय सिंधुबाई हरिबा घाडगे यांच्या खूनप्रकरणी अटक झालेल्या गणेश मारुती माने (वय ३२, रा. उंब्रज, ता. इंडी, जि. विजापूर) यास कोल्हापूर येथील उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती श्री. शिवकुमार दिघे यांनी ₹२०,००० च्या जातमुचलक्यावर जामिनाचा आदेश दिला.
🔹 प्रकरणाचा तपशील:
गणेश माने व विष्णू भोसले यांनी संगनमत करून वाघोळी येथील बंद घराची घरफोडी करण्याचा प्रयत्न केला. त्यादरम्यान आरबळी–बेगमपूर कच्च्या रस्त्यालगत असलेल्या घरात एकटी राहणाऱ्या सिंधुबाई घाडगे यांचा प्रतिकार होताच त्यांचा कोयत्याने खून करून, त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुटल्याचा आरोप आहे. चोरीचा माल घेऊन आरोपी फरार झाले व वापरलेले हत्यार भीमा नदीत फेकून दिल्याचे आरोपपत्रात नमूद आहे.

या प्रकरणाची फिर्याद मृत महिलेच्या जावयाने परमेश्वर तुकाराम कलुबुरमे यांनी कामती पोलिस ठाण्यात दिली होती.
🔹 जामिनासाठी न्यायालयीन लढा:
जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे जामीन अर्ज फेटाळल्यानंतर, आरोपी गणेश माने याने अॅड. रितेश थोबडे यांच्या माध्यमातून कोल्हापूर उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला.
सुनावणीदरम्यान अॅड. रितेश थोबडे यांनी ठोस युक्तिवाद मांडला की, “सदर गुन्हा हा पूर्णपणे परिस्थितीजन्य पुराव्यावर आधारित असून, आरोपीविरुद्ध कोणताही थेट पुरावा नाही.”या मुद्द्याचा स्वीकार करत न्यायालयाने जामीन मंजूर केला.
🔹 खटल्यातील वकिलांची बाजू:
या प्रकरणात आरोपीतर्फे अॅड. रितेश थोबडे व अॅड. किरण सराटे यांनी तर सरकारतर्फे अॅड. एस. एच. यादव यांनी काम पाहिले.