MH13NEWS network
सोलापूर, दि. ७ —घरगुती वादातून जावयावर कोयत्याने हल्ला केल्याच्या आरोपाखालील सोलापूरच्या पाच जणांची सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.
निर्दोष ठरलेल्यांमध्ये राचय्या हिरेमठ (५०), विजयालक्ष्मी हिरेमठ (४८), प्रिया संबाळ (२५), विशाल हिरेमठ (२३) आणि केदार हिरेमठ (२०) यांचा समावेश आहे. यांच्यावर जावई सोमप्रकाश संबाळ, श्रीदेवी संबाळ आणि सिद्धरामय्या संबाळ यांच्यावर खुनी हल्ला करून गंभीर जखमी केल्याचा आरोप होता.

📌 प्रकरणाची हकीकत:
१३ एप्रिल २०२० रोजी रात्री साडेआठच्या सुमारास जुन्या वैरातून आरोपींनी फिर्यादींच्या घरात घुसून कोयत्याने हल्ला केल्याची फिर्याद विजयालक्ष्मी संबाळ यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात दिली होती. तपास अधिकारी पोलीस निरीक्षक बी. एच. पाटील यांनी तपास पूर्ण करून आरोपपत्र दाखल केले.प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांच्या न्यायालयात चाललेल्या सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे १३ साक्षीदारांची साक्ष घेण्यात आली.
सरकारी वकीलांनी डॉक्टरांच्या साक्षी आणि शस्त्रजप्तीच्या पुराव्यांवर भर देत आरोपींना दोषी ठरवण्याची मागणी केली.मात्र आरोपींच्या वतीने अॅड. शशि कुलकर्णी आणि अॅड. विद्यावंत पांढरे यांनी ठोस युक्तिवाद केला की — “साक्षींमध्ये विसंगती आहे, डॉक्टरांची साक्ष कथानकाला पूरक नाही, आणि फिर्याद उशिरा दिल्याने घटनाक्रम संशयास्पद ठरतो.”
दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सर्व पाच आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
🔹 खटल्यातील वकिलांची बाजू:
आरोपीतर्फे अॅड. शशि कुलकर्णी, अॅड. विद्यावंत पांढरे, अॅड. प्रणव उपाध्ये, अॅड. प्रसाद अग्निहोत्री आणि अॅड. रणजित चौधरी यांनी तर सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग रजपूत यांनी काम पाहिले.