MH 13 NEWS NETWORK
मुंबई – : लोकसभा निवडणूकीची आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली असून राजकीय पक्षांनीही आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी तथा ३१-मुंबई दक्षिण लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी रवि कटकधोंड यांनी केले आहे.
लोकसभा निवडणूक प्रक्रिया आणि राजकीय पक्षांनी पाळावयाची आचारसंहिता याबाबत माहिती देण्यासाठी ३१-मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातील विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक निवडणूक निर्णय अधिकारी श्री. कटकधोंड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी स्वप्नील कापडणीस, सहायक पोलीस आयुक्त अनिल देशमुख यांच्यासह नोंदणीकृत राष्ट्रीय व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
श्री. कटकधोंड म्हणाले, निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार निवडणूक प्रक्रिया पार पडावी यासाठी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी सहकार्य करावे. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी प्रचारासाठी नियमाप्रमाणे परवानगी घ्यावी. सभा, पदयात्रा, रॅलीबाबत निर्धारित वेळ पाळावी आणि त्यासाठी पोलीसांची परवानगी घ्यावी. उमेदवारांनी दैनंदिन खर्च अहवाल सादर करणे अत्यावश्यक असून निवडणूक अर्ज भरण्याअगोदर स्वतंत्र बॅंक खाते उघडावे लागणार असल्याचे श्री.कटकधोंड यांनी यावेळी सांगितले. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या शंकांचे निरसन यावेळी श्री.कटकधोंड यांनी केले.
३१-मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी २० मे रोजी मतदान होणार असून त्यासाठीची अधिसूचना दिनांक २६ एप्रिल रोजी निर्गमित होणार आहे. या मतदारसंघात एकूण १५ लाख २४ हजार ९३९ इतके मतदार असून यामध्ये पुरुष मतदारांची संख्या ८ लाख २७ हजार १७८, महिला मतदार ६ लाख ९७ हजार ७१८ आणि इतर ४३ मतदार आहेत. तर मतदान केंद्र १५२७ आहेत.