MH 13 NEWSW NETWORK
मुंबई : प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी, स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट व महाराष्ट्र दिन १ मे रोजी राष्ट्रीय कार्यक्रमांचे आयोजन राज्यात करण्यात येते. राष्ट्रीय कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर साजरे करण्यात येतात. अशा कार्यक्रमांच्या ठिकाणी प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वज नागरिकांकडे दिसून येतात. याव्यतिरिक्त महत्त्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा सामन्यांच्यावेळी अशा प्रकारचे राष्ट्रध्वज निदर्शनास येतात. मात्र, कार्यक्रम पार पडल्यानंतर खराब झालेले, माती लागलेले राष्ट्रध्वज मैदानात किंवा रस्त्यावर पडलेले असल्याचे आढळून येते. अशा कार्यक्रमांच्या ठिकाणी राष्ट्रध्वज आढळून आल्यास हे राष्ट्रध्वज गोळा करून संबंधित तहसिल कार्यालय अथवा जिल्हास्तरावरील यंत्रणेकडे सुपूर्द करावे.
प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वजांचा वापर थांबविण्यासाठी जनजागृती करण्याकरिता मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी जिल्हास्तरावर व अंधेरी, बोरीवली व कुर्ला (मुलुंड) या तीन तालुक्यांकरिता तालुकास्तरावर समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. येत्या १ मे महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमानंतर मैदानात किंवा रस्त्यावर पडलेले राष्ट्रध्वज आढळून आल्यास संबंधित तहसिल कार्यालयात किंवा जिल्हास्तरावरील यंत्रणेकडे सुपूर्द करावे, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी केले आहे.