महेश हणमे / 9890440480
संपूर्ण राज्यात उष्णतेची लाट आली असून राज्यात तापमानाचा पारा वाढतच चालला आहे. सोलापूर की शोलापूर.? असंच वाटत असून आज मंगळवारी ४४ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. जिकडे बघावे तिकडे सोलापूरकर अबे, लय गरम व्हतयं..! माणूस वाळून चाललाय बे..!! अशीच चर्चा सुरू आहे.
इतके कडक उन पडत आहे की दुपारी रस्ते निर्मनुष्य दिसत असून कडक उन्हामुळे अंगाची लाही लाही होत आहे. प्रत्येकाला 20 रुपयाची पिण्याच्या पाण्याची बाटली परवडणे शक्य नसल्याने पाणपोईकडे सर्वसामान्य नागरिक वळतो. परंतु सामाजिक संघटनेचे दुर्लक्ष होत असल्याने पाणपोई नामशेष होण्याच्या मार्गावर आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.
राज्यात उष्णतेची लाट..
राज्यात तापमानाचा पारा वाढतच चालला असून मंगळवारी ४४ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद सोलापुरात झाली आहे. रविवारी सोलापूरकरांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागला. राज्यामध्ये तापमानाचा पारा रविवारी चढा होता. सोलापुरातही कमाल तापमानाचा पारा ४३.७ अंश सेल्सिअस असल्याची नोंद झाली होती. एप्रिलमधील ही दुसरी उष्णतेची लाट होती. मे महिन्यातही असेच वातावरण असू शकेल, असाही अंदाज हवामान विभागाच्या वतीने या निमित्ताने वर्तवण्यात येत आहे.
उष्माघातामुळे राज्यात हाहाकार माजला असून शासनाने उष्माघातापासून काळजी घ्यावी असे आवाहन केलेले आहे. विशेष म्हणजे वृद्ध व्यक्ती, लहान मुले, गरोदर स्त्रिया यांनी काळजी घ्यावी असे आवाहन देखील केले आहे.
मुक्या जीवाचे काय हाल होत असतील..?
सोलापुरात पाच किंवा सहा दिवसाला एकदा पाणी येते. आधी जागोजागी पाणपोया दिसायच्या. आता ते प्रमाण खूप कमी झाले आहे. मुक्या जनावरांसाठी रस्त्याच्या कडेला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जायची. आता क्वचितच कुठेतरी असे दिसते. अशा मुक्या जीवाचे काय हाल होत असतील.? सामाजिक संस्था, संघटनानी याबाबतीत पुढे येण्याची अपेक्षा आहे.