अनिल हणमे /माढा
माढ्याचे ग्रामदैवत श्री माढेश्वरी मंदीराच्या जिर्णोद्धारासाठी राज्य शासनाच्या पुरातत्व विभागाकडून 3 कोटी 51 लाख निधी मंजूर झाला असल्याची माहिती आ.बबनराव शिंदे यांनी दिली.पुरातत्व विभागाकडून ऐतिहासिक मंदिराचे जतन होणार आहे.
माढयाचे ग्रामदैवत तसेच लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीमाढेश्वरी देवीच्या मंदीराची दुरावस्था झाली आहे. दर्शनासाठी येणाऱ्या स्त्री-पुरुषांसाठी, आबाल वृद्धांसाठी महत्त्वाच्या सुविधा उपलब्ध होत नाही.कोजागिरी पौर्णिमेला मोठी यात्रा भरते.यावेळी माढा पंचक्रोशीतील अबालवृद्धांची मोठी गर्दी होते.परंतू मंदीराच्या जिर्णोद्धारासाठी मोठा निधी मिळत नसल्याने भाविकांची मोठी गैरसोय या ठिकाणी होताना दिसत होती.
माढा नगरपंचायतीने परिसरातील स्वच्छता करतानाच छबीना मार्ग, दोन्ही प्रवेशद्वारासमोर ब्लॉक टाकून सुशोभीकरण केले आहे.आता आमदार बबनराव शिंदे यांच्या प्रयत्नातून साडे तीन कोटी रूपयांचा निधी उपलब्ध होणार असल्याने करमाळा व तुळजापूरच्या मंदीरांप्रमाणे माढेश्वरी देवीचे मंदीरही सुशोभित होण्यास मदत होणार असल्याने भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तालुक्याचे ठिकाण असलेल्या माढ्यास ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. या पवित्र धार्मिक माढेश्वरी मंदिराचे संवर्धन व जतन व्हावे यासाठी पुरातत्व विभागाकडे मागणी केली होती. त्याबाबतचे प्रस्ताव सादर करणेचे निर्देश दिले होते. त्याबाबत शासनाने या मंदिराचा समावेश नमो तीर्थस्थळ सुधार योजनेत करण्यात आला. शासनाकडे माढेश्वरी मंदिरास निधी उपलब्ध होणेकरीता शासन दरबारी पाठपुरावा सुरु होता. त्यानुसार माढा येथील माढेश्वरी मंदिराच्या दुरुस्तीसाठी 3 कोटी 51 लाख निधी मंजूर झाला असल्याची माहिती आ. बबनराव शिंदे यांनी दिली.