MH 13News Network
मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी राज्यभरात घेण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी आज मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे यांना सुपुर्द केला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

‘वर्षा’ निवासस्थानी आज सकाळी हा अहवाल सुपुर्द करतेवेळी आयोगाचे सदस्य देखील उपस्थित होते. यावेळी आयोगासह संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा तसेच अधिकारी, कर्मचाऱ्यांनी विक्रमी वेळेत सर्वेक्षण केल्याबद्धल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे कौतूक केले. या सर्वेक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी बैठका घेऊन युद्ध पातळीवर हे सर्वेक्षण पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
सद्यस्थितीमध्ये मराठा आरक्षणासाठी आणि अधिसूचनेच्या पूर्ततेसाठी मनोज जरांगे पाटील 10 फेब्रुवारी पासून आमरण उपोषणाला अंतरवाली सराटी या ठिकाणी बसलेले आहेत. शासन उपोषणाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मराठा समाजाने केलेला असून राज्यभर मराठा समाजामध्ये संताप पसरला आहे.
दरम्यान ठीकठिकाणी पुन्हा एकदा उपोषणांची मालिका आणि आंदोलने सुरू करण्यात आलेली आहेत.