MH 13 NEWS NETWORK
अक्कलकोट : महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्था अक्कलकोट संचलित सौ सुरेखा कल्याणशेट्टी मराठी व सेमी इंग्रजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात भारतीय संविधान प्रतिमेचे पूजन वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्रसिंह लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी, पर्यवेक्षक सूर्यकांत रूगे व सेमी विभागाचे दिगंबर जगताप हे उपस्थित होते.
भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या घटनेमुळे भारतीय लोकशाही आजही मजबूत आहे. संविधानाने लोकांना समान न्याय, हक्क व अधिकार दिलेला आहे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी देशाने संविधान स्वीकारले, तेव्हापासून 26 नोव्हेंबर हा दिवस देशात सर्वत्र संविधान दिन आणि राष्ट्रीय कायदा दिवस म्हणून साजरा केला जातो.
यानिमित्त देशभरातील शाळांमध्ये विविध कार्यक्रम घेतले जातात भाषण स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा विविध स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी जागरूकता निर्माण केली जाते. हे संविधान भारताला सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रजासत्ताक म्हणून घोषित करते. भारताची राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे. संविधानाची मूल्ये, तत्वे, हक्क व अधिकार याविषयी विद्यार्थ्यांना यावेळी प्राचार्य डॉ. राजेंद्रसिंह लोखंडे यांनी मार्गदर्शन केले
यानंतर संविधानावर आधारित इ 7 वी तील कुमारी अतूफा कारंजे व सेमी विभागाची ऋत्विक मुसळे या विद्यार्थ्यांची भाषणे झाली. यावेळी विद्यार्थ्यांकडून संविधानाचे वाचन करून घेतले तसेच निबंध व चित्रकला स्पर्धा घेण्यात आले. या विविध स्पर्धेत शाळेतील 680 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
उपक्रम यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख कल्पना स्वामी, निशिगंधा कोळी, पूजा कडबगावकर, शरणबसप्पा चानकोटे, श्रीदेवी मायनाळे, राजकुमार गवळी, सिद्रामप्पा पाटील, मनीषा दूधभाते आदी शिक्षकांनी परिश्रम घेतले.