MH 13 NEWS NETWORK
श्री सदगुरू प्रभाकर स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त ९ किमी रथ मिरवणूक उत्साहात : भाविकांकडून रांगोळ्यांच्या पायघड्या
‘जय जयकार जय जयकार प्रभाकर स्वामी महाराजांचा जय जयकार…’ म्हणत शनिवारी सोलापूर शहरातून मोठ्या भक्तीभावात रथ आणि पालखी मिरवणूक निघाली. निमित्त होते
श्री सदगुरू प्रभाकर स्वामी महाराजांच्या ६८ व्या पुण्यतिथीचे.
श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिर सार्वजनिक ट्रस्टतर्फे परंपरेप्रमाणे ही रथ मिरवणूक काढण्यात आली. प्रारंभी सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमन यांच्या हस्ते श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराजांच्या रथाचे आणि मूर्तीचे पूजन करण्यात आले. यानंतर रथ मिरवणुकीस प्रारंभ झाला. यावेळी श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिर सार्वजनिक ट्रस्टचे चीफ ट्रस्टी मोहन बोड्डू, मॅनेजिंग ट्रस्टी बाळकृष्ण शिंगाडे, ट्रस्टी उदय वैद्य, वसंत बंडगर, वामन वाघचौरे, मंदिर समिती सदस्य सुभाष बद्दरकर, रवी गुंड, सम्राट राऊत, रमेश देशमुख, रामभाऊ कटकधोंड, व्यवस्थापक निरंजन दंतकाळे आदी उपस्थित होते.
मिरवणुकीच्या अग्रभागी सजवलेल्या बैलगाडीत सनई – चौघडा वाजत होता. त्यामागे बँड पथकाकडून विविध वाद्यांच्या तालावर भक्तीगीते सादर केली जात होती. यामागे सजवलेल्या विविध ६ बग्गीमध्ये श्री सद्गुरु प्रभाकर स्वामी महाराज, श्री गुरु बसपय्या स्वामी, श्री गुरुलिंग जंगम महाराज, उमदी श्री भाऊसाहेब महाराज, श्री तिकोटीकर स्वामी महाराज, गोधडचे श्री स्वामी महाराज, श्री माणिकप्रभू महाराज, श्री अक्कलकोट स्वामी समर्थ
महाराज, श्री समर्थ रामदास स्वामी महाराज, श्री यशोदामाई, श्री इनामदार गुरुजी यांच्या प्रतिमा ठेवल्या होत्या. यामागे पालखी आणि शेवटी भाविकांकडून दोराने रथ ओढला जात होता.
या रथ मिरवणूकीत दत्तात्रय महाराज भजनी मंडळ, श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिर सार्वजनिक ट्रस्ट भजनी मंडळाने भजने सादर केली. यावेळी पांढरी वारकरी टोपी तसेच भगव्या टोप्या परिधान केलेले भाविक सहभागी झाले होते. मिरवणूक मार्गावर महिला भाविकांकडून रांगोळ्यांच्या पायघड्या घातल्या जात होत्या.
सम्राट चौक येथील श्री सद्गुरु प्रभाकर स्वामी महाराज मंदिरापासून सुरुवात झालेली ही रथ मिरवणूक बाळीवेस, चाटी गल्ली, कुंभार वेस, कोंतम चौक, कन्ना चौक, राजेंद्र चौक, साखरपेठ, माणिक चौक, दत्त चौक, नवी पेठ येथील श्री राम मंदिर, चौपाड, पत्रा तालीम, छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकमार्गे पुन्हा मंदिरात विसर्जित झाली.