MH 13 NEWS NETWORK
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पूरग्रस्त भागाची पाहणी
पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील पूरग्रस्त भागाची पाहणी करून पूरबाधित नागरिकांशी संवाद साधला. पुराचा धोका कायस्वरुपी दूर करण्याकरिता तसेच पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने निर्माण होणाऱ्या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी शासनाच्यावतीने नवीन धोरण आणण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पाटील इस्टेट, शिवाजीनगर व डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालय, पीएमसी कॉलनी, वाकडेवाडी, जुनी सांगवी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मनपा शाळा, एकता नगर सिंहगड रोड, खडकवासला येथे भेट देऊन रहिवासी तसेच स्थलांतरित नागरिकांशी संवाद साधला.
यावेळी आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार भीमराव तापकीर,माधुरी मिसाळ, अण्णा बनसोडे, सिद्धार्थ शिरोळे, अश्विनी जगताप, विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, पुण्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर निळ्या पूररेषेचे फेरसर्वेक्षण करण्यात येईल. पूरबाधित नागरिकांना शासनाच्यावतीने आवश्यक ती मदत करण्यात येत आहे. परंतु, पुराचा धोका कायस्वरुपी कमी करण्यासाठी शासनाच्यावतीने उपाययोजना करण्यात येतील. पूरबाधित घरांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नवीन विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (डीसीआर) तयार करण्यात येईल. घराच्या पुर्नविकासासाठी आवश्यकतेनुसार कायद्यात व नियमातही बदल करण्यात येईल, असे श्री. शिंदे यांनी सांगितले.
जुनी सांगवी येथील पूरग्रस्तांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संवाद
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुनी सांगवी परिसरातील स्थलांतरित पूरबाधित नागरिकांची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मनपा शाळेत भेट घेऊन त्यांना दिलासा दिला. शासनाकडून सर्व आवश्यक ती मदत करण्यात येत असून बाधित क्षेत्रातील नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात येईल, असे ते यावेळी म्हणाले.यावेळी पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त श्री. सिंह यांनी पूरग्रस्तांसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
एकता नगर येथे मुख्यमंत्र्यांची भेट
सिंहगड रोडवरील एकता नगर येथील पूरग्रस्त नागरिकांसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली तसेच सुमारे दीड तास नागरिकांची विचारपूस करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. प्रत्येक नागरिकाचा जीव महत्त्वाचा असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
त्यानंतर या भागातील गटार लाईनची दुरुस्ती, पाण्याची नवीन लाईन टाकणे आदी पायाभूत सुविधा नागरिकांना पुरवाव्यात, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी पुणे महानगरपालिका प्रशासनाला दिले. पूरबाधित भागातील विविध भागात मदत कक्ष सुरू करण्यात आले असून आरोग्य पथके आणि जवळपासची रुग्णालये सज्ज ठेवावीत, आदी सूचना त्यांनी दिल्या. त्यानंतर खडकवासला धरणाच्या बॅक वॉटरची त्यांनी अधिकाऱ्यांसह पाहणी केली.
श्री. शिंदे यांच्या हस्ते पूरबाधित नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.