mh 13 news network
सोलापूरच्या गारमेंट उद्योगाला दिलासा
सोलापूर
राज्य सरकारने ’एक राज्य, एक गणवेश’ योजना मागे घेतली आहे. यापुढे गणवेशाचा रंग आणि रचना निश्चित करण्याचे अधिकार शाळा व्यवस्थापन समितीला देण्याचा निर्णय सरकारने बुधवारी जाहीर केला. एक राज्य एक गणवेशमुळे सोलापुरातील 15 हजार कामगारांना फटका बसला होता. त्यामुळे ही योजना बंद करण्यासाठी आ. सुभाष देशमुख यांनी शासनासह राज्यपालांकडे वारंवार पाठपुरावा केला होता, अखेर त्याला यश आले आहे.
हा निर्णय रद्द झाल्यानंतर सोलापुरातील गारमेंट असोसिएशनच्या पदाधिकार्यांनी आ. देशमुख यांचा सत्कार करत आभार मानले. या निर्णयामुळे सोलापूरच्या गारमेंट उद्योगाला दिलासा मिळाला आहे.
शिंदे सरकारच्या काळात तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ’एक राज्य, एक गणवेश’चा निर्णय घेतला होता.

हा राज्य स्तरावर कापड खरेदीचा निर्णय वादात अडकला होता. विद्यार्थ्यांना वेळेत गणवेश मिळाले नसल्याने पालकांची मोठी नाराजी सरकारला सहन करावी लागली होती.
याशिवाय गारमेंटसाठी प्रसिद्ध असलेल्या सोलापुरातील सुमारे 15 हजार कामगांराना याचा मोठा फटका बसला होता. याबाबत येथील गारमेंट असोसिएशनच्या पदाधिकार्यांनी याबाबत आ. सुभाष देशमुख यांची भेट घेत आपली व्यथा व्यक्त केली होती.

आ. देशमुख यांनी याबाबत संबंधित मंत्री, मुख्यमंत्र्यांकडे गारमेंट पदाधिकारी कामगारांच्या अडचणी सांगत ही योजना रद्द करण्यासाठी पाठपुरावा केला होता. याशिवाय आ. देशमुख यांनी गारमेंटच्या पदाधिकार्यांनी घेऊन राज्यपालांचीही भेट घेतली होती.

अखेर आ. देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. बुधवारी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, यापुढे केंद्र सरकराच्या समग्र शिक्षा व राज्य सरकारच्या मोफत गणवेश योजनेची अंमलबजावणी पूर्वीप्रमाणेच शाळा व्यवस्थापन समितीमार्फत करण्यात येणार आहे. त्यासाठी समग्र शिक्षांतर्गत केंद्र सरकारने निश्चित केलेली गणवेशाची रक्कम व राज्य सरकारच्या मोफत गणवेशाची रक्कम शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यावर महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई या कार्यालयाकडून देण्यात येणार आहे.

हा निर्णय झाल्यानंतर सोलापूरच्या गारमेंट असोसिएशनच्या पदाधिकार्यांनी आ. देशमुख यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानले

. यावेळी असोसिएशनचे उपाध्यक्ष सतीश पवार, सेके्रटरी प्रकाश पवार, खजिनदार श्रीकांत आंबूरे, सुनील मेंगजी, अमित जैन यासह पदाधिकारी उपस्थित होते.
शासनाच्या निर्णयामुळे गेल्या दीड वर्षांपासून सोलापूरच्या गारमेंट इंडस्ट्रीजला मोठा फटका बसला होता. आम्ही याबाबत आ. सुभाष देशमुख यांची भेट घेतली होती. त्यांनी शासन दरबारी प्रयत्न करून हा निर्णय मागे घ्यायला लावला. त्यामुळे गारेमेंट क्षेत्राला दिलासा मिळाला आहे. सोलापुरात आणखी रोजगार मिळणार आहे. हे सर्व आमदार देशमुख यांच्यामुळे शक्य झाले.
प्रकाश पवार
गारमेंट असोसिएशनचे उपाध्यक्ष