महेश हणमे / 9890440480
केसरी गर्जना, दैनिक सुराज्य मध्ये क्राईम रिपोर्टिंग तसेच राजकीय वार्तांकन करणारे पत्रकार अभिजीत वडगावकर यांचे आज सोमवारी आकस्मित निधन झाले. सोलापुरातील बेवारस मृतदेहांवर त्या -त्या धर्मानुसार अंत्यविधी करणाऱ्या मुक्ती सेवाभावी संघटनेचे ते संस्थापक होते. त्यांच्या निधनामुळे एक सामाजिक बांधिलकी असणारा पत्रकार काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.

अभिजीत वडगावकर यांनी उत्तर कसब्यातील एका छोट्या कार्यालयात मुक्ती सेवाभावी संघटनेची स्थापना केली होती. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल) मधील बेवारस मृतदेहांवर अंत्यविधी करण्याचे मोठे आणि हटके काम संस्थेच्या माध्यमातून ते करत होते.

त्यांच्यासोबत जवळपास 15 ते 20 जणांची टीम होती. साधारण 1995 च्या सुरुवातीला त्यांनी सामाजिक कामास सुरुवात केली होती. संस्थेचे मार्गदर्शक तसेच अभिजीत यांचे वडील मोहन वडगावकर आणि प्रकाश वाले यांच्या मार्गदर्शनाखाली अभिजीत यांनी कार्यास सुरुवात केली होती.
अनिल छत्रबंद, नागेश हलकुडे, श्रीकांत सुतार, सुधा किरण काळे, राजशेखर सुतार, श्रीकांत काळे, सुरेश सुतार, विजय सारंगमठ, राहुल पंडित, किरण आलुरे, चंद्रशेखर हिरेमठ, प्रकाश देडे व कुमार डोलारे,राजाभाऊ जावळे, बेळे या कार्यकर्त्यांनी त्यांना मोलाचा सहभाग दिला होता.
मुक्तीची अशी होती कार्यपद्धती..!

मृतदेह बेवारस म्हणून घोषित केला की पोलीस मुक्तीशी संपर्क साधतात. दोन छापील फॉर्म भरून दिले की पोलिसांचे काम संपले. नंतर मुक्तीचे कार्यकर्ते शासकीय रुग्णालयातील शवागृहात जातात. संबंधित मृतदेह प्रथम पांढऱ्या वस्त्रामध्ये बांधतात. मृतदेहाची दुर्गंधी सुटू नये म्हणून त्यावर निलगिरी तेल शिंपडण्यात येत असे. मृतदेह फारच छिन्नविच्छिन्न वा कुजलेल्या अवस्थेत असल्यास प्लास्टिकच्या पिशवीत ठेवून बांधला जात असे. शववाहिकेतून मृतदेह मोदी स्मशानभूमी कडे नेण्यात येतो.
या ठिकाणी पोलीस खात्याच्या संकेतनुसार मृतदेह दफन करण्यात येतो. नंतर हळदीकुंकू पुष्पहार वाहण्यात येतात.उदबत्ती व कापूर प्रज्वलित करण्यात आल्यानंतर दोन मिनिटं स्तब्धता पाळून मृतात्म्यास सद्गती मिळावी यासाठी मुक्ती सेवाभावी संघटनेच्या वतीने प्रार्थना करण्यात येत असे. विशेष म्हणजे रहदारी सुरू होण्यापूर्वी म्हणजे सकाळी सात ते नऊच्या दरम्यान हे कार्य होत असल्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास होत नव्हता .अशा पद्धतीने मुक्ती सेवाभावी संघटनेच्या वतीने जवळपास 2280 बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते.
संघटनेस मिळालेले पुरस्कार..!

अभिजीत वडगावकर यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन विविध संस्थांनी पुरस्कार रुपी शाब्बासकीची थाप संस्थेच्या पाठीवर मारली होती. राजर्षी छत्रपती शाहू महाराज महामंडळ, इंडियन कल्चर सोसायटी, पुणे, मणीभाई देसाई प्रतिष्ठान पुणे, ब्रह्मदेव माने प्रतिष्ठान सोलापूर, उतराई प्रतिष्ठान, औरंगाबाद, गांधी फोरम सोलापूर, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई तसेच सोलापूर महोत्सवातील पहिला सोलापूर गौरव पुरस्कार मुक्ती संघटनेला मिळाला होता.
अध्यात्मिक क्षेत्रातील नावाजलेले भय्यू महाराज यांच्या हस्ते अभिजीत यांचा सत्कार करण्यात आला होता.

सुधा मूर्ती यांनी दिली होती कार्यालयाला भेट..!

इन्फोसिसचे श्री नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांना मुक्ती सेवाभावी संघटनेच्या कार्याची माहिती मिळाल्यानंतर ते दोघे भारावून गेले होते. सुधा मूर्ती यांनी सोलापुरातील मुक्ती संस्थेच्या कार्यालयाला भेट देऊन पाच लाखाची मदत दिली होती.
तत्कालीन पोलीस आयुक्त अशोक कामटे यांनीही वडगावकर यांच्या कार्याचे कौतुक केले होते.

मोदी स्मशानभूमीतील हाडे व कचऱ्याची होळी मुक्ती सेवा संघटनेच्या वतीने करण्यात आली होती.

यामध्ये स्मशानभूमीमध्ये अस्ताविस्त पडलेली हाडे, कवट्या, कपडे व इतर कचरा गोळा करून त्याला अग्नी देण्यात आला होता. मराठी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष मनीष केत यांचे हस्ते ढिगार्यास अग्नी देण्यात आला होता.
पत्रकारितेतील ठसा..!
केसरी गर्जनेच्या माध्यमातून त्यांनी पत्रकारितेमध्ये विविध लेख लिहून आपली ओळख निर्माण केली होती. तर अस्सल सोलापुरी दैनिक सुराज्य या नामांकित दैनिकांमधील त्यांचे लेख चांगलेच गाजले होते.
निवाऱ्यासाठी धडपडते कोल्हट्याच्या पोराची माय ; शासकीय अधिकारी स्वखर्चातून देणार अभागी मातेला छत ही बातमी चांगलीच गाजली होती.
राजकीय निवडणूक विश्लेषण करण्यामध्ये त्यांचा हातखंडा होता. आखाडा महापालिका निवडणुकीचा या मालिकेद्वारे त्यांनी अनेक विषयांवर अभ्यासपूर्ण लेखन केले होते.
तुझ्या दुर्दशेकडे दुर्लक्ष,बाप्पा माफ कर आम्हा सोलापूरकरांना..!
यामध्ये मूषक आणि अर्धवट विसर्जत झालेले गणपती बाप्पा यांच्यातील संवाद बातमी रूपाने त्यांनी मांडला होता.
उद्या सकाळी अंत्यसंस्कार..!

उद्या दिनांक 28 जानेवारी रोजी मंगळवारी सकाळी सात वाजता महालक्ष्मी दुध डेअरी जवळील त्यांच्या राहत्या घरापासून अंत्ययात्रा निघणार आहे. जुना पूना नाका येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात येणार आहेत.