पुणे : प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्यावतीने नेहमीच सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा ॲड. सुसीबेन शहा यांनी केले.
महिला व बालविकास विभाग आणि होप फॉर चिल्ड्रन फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने येरवडा येथील अण्णा भाऊ साठे सभागृहात आयोजित, पुणे विभागातील बालगृह व निरीक्षणगृहातील इयत्ता १० वी आणि १२ वी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात त्या बोलत होत्या. यावेळी महिला व बालविकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, विभागीय उपायुक्त संजय माने, राज्य बालहक्क संरक्षण आयोगाचे सदस्य ॲड. संजय सिंघल, चैतन्य पुरंदरे, ॲड. जयश्री पालवे, होप फॉर द चिल्ड्रन फौंडेशनचे संस्थापक डॉ. कॅरोलिन ऑडॉयर डी कॉल्टर आदी उपस्थित होते.
ॲड. शहा म्हणाल्या की, २१ व्या शतकात स्वतःची प्रगती करण्यासाठी आपल्या अंगी अशीच जिद्द, चिकाटी आणि मेहनत करण्याची तयारी ठेवा. नेहमी उपक्रमशील राहा, सतत वाचन सुरु ठेवा. विविध खेळाच्या माध्यमातून शरीर सदृढ होते, त्यामुळे प्रत्येकानी किमान एक तरी खेळ खेळला पाहिजे. आपल्या ज्ञानाचा उपयोग प्रतिकूल परिस्थितीत धडपड करणाऱ्या विद्यार्थ्यांना झाला पाहिजे.
आपल्या मान, सन्मानासाठी तसेच स्वतःमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी शिक्षण घेत राहा. देशाच्या प्रगतीत आपले योगदान राहील असे काम करावे. चांगल्या समाजाच्या निर्मितीकरीता काम करत राहा. आपल्या अडचण असल्यास बालगृह व निरीक्षणगृहाच्या अधीक्षकाशी चर्चा करा. महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग कायम आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असेही डॉ. शहा म्हणाल्या.
डॉ. नारनवरे म्हणाले की, बालकाचे हित लक्षात घेवून बालहक्क संरक्षण आयोग नेहमीच महिला व बालविकास विभागाला जागृत करण्याचे काम करीत असते. विभागाच्यावतीने बालसंगोपन योजनेअंतर्गत एका वर्षात सुमारे १ लाख २५ हजाराहून अधिक लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे, याकरीता पुणे, नाशिक, नागपूर, पालघर अशा शहरात संगणकीकृत प्रयोगशाळा (डिजीटल लॅब) कार्यान्वित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अनाथ मुलांना एक टक्का आरक्षण देण्यात आले असून याचा लाभ घेवून २७३ विद्यार्थी शासकीय सेवेत दाखल झाले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा प्रबोधिनी, उल्हासनगर येथे स्थापन करण्यात येत असून येथे बालगृह व निरीक्षणगृहातील विद्यार्थ्यांना अग्निवीर, पोलीस शिपाई आदी भरती प्रकियेविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. विविध शासकीय योजनांची माहिती मिळण्याकरीता एक ॲप विकसित करण्यात येत आहे. मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेसह विविध योजनांचा लाभ देवून विद्यार्थ्यांचे जीवनमान उंचविण्याकरीता महिला व बालविकास विभाग प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही डॉ. नारनवरे यांनी दिली.
श्री. पुरंदरे म्हणाले, समाजात सजग नागरिक घडविण्यासोबत तसेच विपरीत परिस्थितीला आळा घालण्यासाठी आयोग काम करीत आहे.
ॲड. पालवे म्हणाल्या, शासकीय यंत्रणा प्रकाशरुपी दिव्याप्रमाणे उजेड देत आहे, या उजेडाचा लाभ घेऊन अशीच प्रगती करत रहावे.
डॉ. कॅरोलिन यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. श्री. माने यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.