मतदानाची प्रेरणा जागविण्यास चित्रप्रदर्शन उपयुक्त- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
MH 13 NEWS NETWORK
छत्रपती संभाजीनगर, :- केंद्रीय संचार ब्युरोमार्फत आयोजित चित्रप्रदर्शन पाहून मतदारांच्या मनात मतदानाची प्रेरणा नक्कीच जागेल आणि ते मतदानासाठी प्रेरीत होतील,असा विश्वास जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज येथे व्यक्त केला.
भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालया अंतर्गत केंद्रीय संचार ब्यूरो, छत्रपती संभाजीनगर द्वारा जिल्हा प्रशासन, जिल्हा माहिती कार्यालय, छत्रपती संभाजीनगर व दक्षिण मध्य रेल्वे यांच्या सहयोगाने मतदार जनजागृती साठी तीन दिवसीय चित्रप्रदर्शनाचे आयोजन छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन येथे करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी, दिलीप स्वामी यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीपचे नोडल अधिकारी सुदर्शन तुपे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, दक्षिण मध्य रेल्वेचे सहा. कमर्शिअल मॅनेजर धनंजय कुमार सिंह व भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्युरोचे सहा. क्षेत्रीय प्रचार अधिकारी प्रदीप पवार आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले, मतदान जनजागृती पर आम्ही जी माहिती प्रशासनाच्या, जिल्हा निवडणूक कार्यालय, स्वीप टीम आदी मार्फत देत आहोत आणि मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहोत त्या प्रयत्नांना हे चित्रप्रदर्शन मोठी मदत ठरेल असे त्यांनी सांगितले. केंद्रीय संचार ब्यूरो, जिल्हा माहिती कार्यालय, रेल्वे प्रशासन, जिल्हा पोलीस प्रशासन व पथनाटय कलाकार यांच्या मार्फत ही जनजागृती होत आहे. नागरिकांनी या चित्रप्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन ही त्यांनी याप्रसंगी केले.
प्रारंभी केंद्र शासनाच्या पंजीकृत आदर्श लोकसेवा सांस्कृतिक मंडळ, छत्रपती संभाजीनगर यांनी मतदार जनजागृतीपर गीतांचे सादरीकरण केले व लोककलेच्या माध्यमातून मतदार जनजागृती केली. हे प्रदर्शन छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानक येथे दि.६ ते दि.८ असे तीन दिवस सकाळी ९ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे. या प्रदर्शनास भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या आयोजनासाठी केंद्रीय संचार ब्यूरो, छत्रपती संभाजीनगरचे प्रदीप पवार, प्रिती पवार, शरद सादिगले यांनी परिश्रम घेतले.