MH 13 NEWS NETWORK
दीपावलीतही प्राणी पूजा महत्त्वाची. सुरुवातिलाच गाईंचे गोठे आणि घराची सफाई करण्यास प्राधान्य दिले आहे.
दिवाळी सुरू होते प्राणी पूजनांनी. दिवाळीच्या गोबारसेने !
आपली भारतीय संस्कृती ही कृषीप्रधान संस्कृती आहे. कृषीशी संबंधित कामे, कृषी हंगाम या सर्वांना धरून विशिष्ट परंपरा उपलब्ध आहेत आणि आपल्या संस्कृतीतील समारंभ उत्सव हे कृषी कार्यक्रमाची निगडीत आहेत. सणउत्सव कृषीकामाच्या वेळापत्रकाप्रमाणे साजरे केलेले दिसून येतात .आपल्या सणांची रचना त्यातील लोकविधी ,कृषी संबंधित अवजारे त्याचप्रमाणे कृषीसहाय्यक नंदीबैल ,नाग इत्यादी पशुपक्षी यांची पूजा यांच्याशी संबंधीत आहे. सणांमधील अनेक लोकविधी आपल्याला कृषक संस्कृतीचे महत्व दर्शवतात. त्याचप्रमाणे लोकगीते ,लोकविधी , लोकोपचार यातून कृषी संस्कृतीच्या विविध परंपरांची गुंफण केलेली दिसून येते.
दिवाळीतील महत्त्वाचा दिवस म्हणजे गो पूजनाचा दिवस गाई गुरांना पुजण्याचा दिवस ! त्यांच्या प्रति कृतज्ञ भाव व्यक्त करण्याचा दिवस हा दिवस म्हणजे आपल्या सर्वांचा आबालवृद्धांचा आवडता दिवस अर्थात वसुबारस किंवा गो बारस .या दिवशी वासरासह गाईची पूजा करण्याची पद्धती व गाई पुढे सर्व कुटुंबांना सुखी ठेवा अशी प्रार्थना करण्याची पद्धत घरामध्ये कुटुंबामध्ये समाजामध्ये स्वस्थता, सामर्थ्य, समृद्धी यावी म्हणून करावयाची क्रियाशील आराधना म्हणून गोधन पूजेला महत्त्व आहे.आपल्याकडे पूर्वीपासून गाईगुरे, पशुधन यांच्या पूजेला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे .बेंदूर, वसुबारस, नवरात्र, श्रावण महिना विशेषतः श्रावण सोमवार इत्यादी महत्त्वाच्या सण उत्सवाच्या दिवशी आपण गाईचे व पशुधनाचे पूजन करत असतो .
दिवाळीतही गाईंच्या गोठ्याच्या व अंगणाच्या सफाई पासून दिवाळी पर्वाची सुरुवात होत असते. गोठ्याच्या स्वच्छतेनंतर आंब्याची पाने व झेंडूची फुले यांचा तोरण बांधणे. गाईगुरे यांची स्वच्छता करणे, त्यांना सजवणे, जखमांवर उपचार करणे, त्यांना ओवाळणे व उत्तम अन्नाचा नैवेद्य देणे अशी आपली पद्धत आहे. तसेच इतर अनेक वेळी महत्त्वाच्या धार्मिक विधित गोग्रास काढून ठेवण्याची आपली परंपरा आहे .दिवाळीत अशाच प्रकारे गाईंना ओवाळून त्यांना उत्तम आहार देण्याची पद्धत आहे .शेतकरी काढण्याने गाई बैल इत्यादी पशुधनाला ओवाळीत असतात .एका लोकगीतामध्ये येणारा संदर्भ दिवाळी आणि कृषी संस्कृती यांचं नातं घट्ट ठेवणार आहे *दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी ।
गावागावात अनेक देवतांची देवळे असतात त्या देवाच्या देवळात विरगळ पुजण्याची आपल्याकडे प्रथा आहे .विरगळाचे तीन टप्पे असतात. पहिल्या टप्प्यात .विराची कर्तुत्व गोष्ट ज्यासाठी त्याने प्राणाहुती दिली. दुसरा टप्पा तो उन्नत शिवलकाकडे जाताना व तिसरा टप्पा शिवलोकी जाऊन महादेवाची पूजन करणारा वीर. अशा पहिल्या टप्प्यामध्ये गाईंचे रक्षण करण्यासाठी प्राणाहुती देणारे गोरक्षक व गाईंचे अंकन केलेले असते असे विरघळ मंदिरातून दिसून येणार. यातून गोधनाचे महत्त्व स्पष्ट केलेले आहे .
भगवान महादेवांचे वाहन नंदी बैल अर्थात शेतकऱ्यांसाठी शेतीत राबणारा मित्र आहे. शेतकऱ्याच्या प्राण सख्याला महादेवांनी आपला सखा मानला आहे. पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे गोधन हे अत्यंत महत्त्वाचे धन मानले जायचे ज्याच्याकडे जास्त गाई तो श्रीमंत मानला जाई. गाईंची संख्या वाढवण्यासाठी चढाओढ स्पर्धा होई. गाई पळवण्याचे प्रकारही झालेले आहेत त्यातून मोठी युद्धे झालेली आहेत .
या दिवशीच्या गुरुद्वादशी निमित्त पशुपतिनाथ महादेवांची पूजा होते. देवादिदेव महादेव शिवशंकर म्हणजे आदिनाथ, नटराज, योगीराज, वैद्यनाथ, पशुपतिनाथ, देवाधिदेव महादेव, त्रिशूलधारी, पिनाकपाणी! अनेक कलांचे अधिष्ठाते 64 कलामध्ये पारंगत असलेले देवाधिदेव !महादेव नृत्य, वाद्य, गायन कथानिवेदन इ . अनेक कलांचे अधिष्ठाते. विविध पंथ,पद्धती विचारधारांचे प्रेरकगुरू. म्हणूनच ते आदिनाथ गुरू म्हणून सर्वांना पूजनीय आहेत
गुरे, पशुधन, गाईचे पूजन हे आपल्या सांस्कृतिक जीवनातील महत्त्वाची परंपरा आहे. कृषीसंस्कृतीच्या दृष्टीने त्याला अत्यंत महत्त्व आहे. गाई आपल्यासाठी अत्यंत पवित्र व मंगल आहेत. गाईंची पूजा ही विकसित कृषीवर संस्कृतीचे कृतज्ञदर्शन आहे. गाईचे दूध ,शेण व त्यावर आधारित सेंद्रिय शेती, गाईपासून उत्तम वासराची पैदास इत्यादी अनेक बाबीचा विचार करता धनधान्याने समृद्ध अशा समाज जीवनाचा व विकसित समाज मनाचा मागोवा गाईपूजनाच्या परंपरेतून दिसून येतो.
भावी काळात गोपालन संस्थेचे संवर्धन होणे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून विकसित सेंद्रिय शेतीला उत्तेजन देणे. गाईंच्या उत्तम आहाराची सोय करणे .उत्तम गाई पैदास करण्यासाठी संशोधन केंद्र उभारणे. जैवतंत्र तंत्रज्ञान व विकसित विज्ञान यांच्या साह्याने दूध व इतर उत्पादनाची उत्तम उत्पादन करणे. हे आपल्या परंपरेचेही खऱ्या अर्थाने संवर्धन होणार आहे
✡️✡️✡️✡️