पुणे – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानभवन येथे झालेल्या बैठकीत श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्याअंतर्गत करण्यात येत असलेल्या विकासकामांचा आढावा घेतला. भीमाशंकर परिसराचा विकास करतांना परिसराचे प्राचीन रूप कायम ठेवावे, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.
बैठकीस सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार दिलीप मोहिते पाटील, माजी खासदार आढळराव पाटील, जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर आदी उपस्थित होते.
श्री.पवार म्हणाले, प्रवेशद्वार आणि पायऱ्यांचे काम जुन्या पद्धतीने करावे. विश्रामगृह आणि पोलीस स्टेशन इमारतीचा आराखडा मंदिराप्रमाणे प्राचिन रुप दिसेल या पद्धतीने करावा. पायऱ्यांसाठी घडाई केलेले दगड वापरावे जेणेकरून चालतांना भाविकांना सुविधा होईल. परिसरातील घरातील सांडपाण्यावर प्रक्रीया करण्यासाठी सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प उभारून त्याचे पाणी मंदिराच्या परिसरापासून दूर सोडावे, असे निर्देश त्यांनी दिले.
विकास आराखड्यातील कामांच्या माध्यमातून येणाऱ्या भाविकांना सुंदर परिसराला भेट देण्याचे समाधान मिळेल यादृष्टीने कामे करावीत. येथील सुविधांसाठी अधिकचा निधी आवश्यक असल्यास तोदेखील देण्यात येईल, असेही श्री.पवार म्हणाले.
श्री.वळसे पाटील म्हणाले, शनिवार आणि रविवारी साधारण 50 हजार भाविक श्री क्षेत्र भीमाशंकर येथे येतात. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, वीज आणि वाहतूक या बाबींवर विशेष लक्ष द्यावे. मंदिरात येणारी भाविकांची संख्या लक्षात घेवून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यात यावा. श्री क्षेत्र भीमाशंकरसाठी देण्यात आलेल्या मिनी बसेसचा उपयोग भाविकांना नियमितपणे होईल याकडे लक्ष द्यावे, असे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी डॉ.दिवसे यांनी सादरीकरणाद्वारे विकास आराखड्यातील कामांची माहिती दिली. श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्याअंतर्गत 148 कोटी 37 लक्ष रुपयांची विकासकामे करण्यात येत आहेत. मंदिराच्या सभामंडपाचे काम पुढील वर्षभरात पूर्ण होईल. मुख्य मंदिर संवर्धनाचे काम अंतिम टप्प्यात आहे. पेशवे बारव, श्री क्षेत्र भीमाशंकर भीमा नदी प्रवाह, कळमजाई मंदिर जतन व संवर्धनाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. भीमाशंकर-मंचर रस्त्याचे कामही करण्यात आले असून शौचालयांचे काम अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती त्यांनी दिली.