पुणे विभागीय मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक संपन्न
पुणे: यावर्षी राज्यातील पर्जन्यमान चांगले असण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला असून शेतकऱ्यांना पेरणीबाबत मार्गदर्शन करण्यासोबत बी-बियाणे आणि पत पुरवठा वेळेवर होईल याकडे विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
विधान भवन पुणे येथे झालेल्या मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापन तयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस आमदार दिलीप मोहिते पाटील, सिद्धार्थ शिरोळे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पुणे जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे, पिंपरी चिंचवडचे प्र.पोलीस आयुक्त सुनील रामानंद, पीएमआरडीए आयुक्त राहुल महिवाल, सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, हवामान विभागाचे शास्त्रज्ञ के.एस.होसाळीकर आदी उपस्थित होते.
श्री.पवार म्हणाले, खते आणि बियाण्यांबाबत शेतकऱ्यांना अडचण येणार नाही याची विशेष दक्षता घ्यावी. बँकांकडून शेतकऱ्यांना पतपुरवठा वेळेवर होईल याकडे लक्ष द्यावे. वेळेवर पतपुरवठा झाल्यास त्यांना कृषी निविष्ठा घेण्यासाठी त्याचा उपयोग होईल. बोगस खते आणि बियाणे विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.
पाऊस चांगला असलेल्या क्षेत्रातील शेतकऱ्यांना पेरणी करण्याविषयी मार्गदर्शन करावे. त्यांना पेरणीसाठी आवश्यक बियाणे पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्यावे. ऊस पाचटबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी साखर कारखान्यांचे सहकार्य करण्यात यावे. शेतकऱ्यांना सौर पंप बसविण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन त्यांनी केले.
विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी सादरीकरणाद्वारे पुणे विभागात करण्यात आलेल्या पूर्वतयारीची माहिती दिली. पुणे जिल्ह्यातील २ तर सातारा जिल्ह्यातील ४ दरड प्रवण गावातील नागरिकांना स्थलांतरित करण्यात येणार आहे. दरड प्रवण गावात आपत्ती मित्रांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, पशुसंवर्धन, आरोग्य, कृषी, राज्य परिवहन महामंडळ, रेल्वे, सहकार, दूरसंचार, विद्युत, पोलीस आदी विविध विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी कृषी विभागातर्फे खरीप हंगामासाठी करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती देण्यात आली. बियाणे आणि खतांची पुरेशी उपलब्धता आहे. विभागात ८८ निविष्ठा विक्री परवाने निलंबित करण्यात आले आहेत आणि एका प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फळबाग लागवडीसाठी ८ हजार हेक्टरचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
श्री.होसाळीकर यांनी राज्यातील हवामानविषयी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.
बैठकीस पुणे विभागातील वरिष्ठ पोलीस अधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अन्य वरिष्ठ अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.