MH 13 News Network
सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाकडून देवेंद्र कोठे हे इच्छुक आहेत. मात्र या ठिकाणी जुन्या व निष्ठावंत कार्यकर्त्याला उमेदवारी द्यावी, काही महिन्यापूर्वीच प्रवेश झालेल्या देवेंद्र कोठे यांना उमेदवारी देऊ नये अशी मागणी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे भाजपाच्या माजी नगरसेवकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
लोकसभा निवडणूक प्रचारामध्ये माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांनी शहर मध्य मधील आणि त्यासोबत त्यांच्या प्रभागातील मतदारांच्या भेटीगाठी घेऊन भाजपासाठी वातावरण निर्मिती केली होती. महिलांचे संघटन करून नरेंद्र मोदी यांच्या प्रचारासाठी मोठी यंत्रणा कोठे यांनी उभी केली होती. भाजपामध्ये प्रवेश केल्यापासून शहर मध्य मध्ये देवेंद्र कोठे यांना संधी मिळेल असे वातावरण सोशल मीडियावर तयार करण्यात आले होते.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पद्मशाली समाजाच्या प्रमुख नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची भेट आणि चर्चा घडवून आणण्यामध्ये देवेंद्र कोठे यांचा सिंहाचा वाटा होता. भाजपच्या विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांच्या संपर्क कार्यालयातून अनेक प्रयत्न केले जात होते.
मात्र,प्रचारादरम्यान त्यांनी केलेल्या भाषणामुळे भाजप पक्षातील आणि विशिष्ट समाजातील लोक मोठ्या प्रमाणावर नाराज झाले होते.
का होतोय विरोध…!
249 सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात भाजपाचे पक्ष संघटन मजबूत असून या मतदारसंघात भाजपाचे एकूण 17 नगरसेवक आहेत. या मतदारसंघातच मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेची राजकीय ताकद कमी आहे. मागील तीन विधानसभा निवडणुकीत त्यांचा उमेदवार तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर असतात.
तसेच नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे विद्यमान खासदार प्रणिती शिंदे, ज्या मागील तीन टर्म पासून आमदार असून देखील त्यांना केवळ 794 इतक्या कमी मताधिक्यावर आणले.
हे सर्व यश आणि श्रेय हे भाजपा संघटनेचे आहे.मध्य मतदारसंघ आपल्या पक्षाला सोडून घेऊन भाजपच्या जुन्या व निष्ठावंत कार्यकर्त्याला उमेदवारी द्यावी. त्या उमेदवारास आम्ही सर्व शहर पदाधिकारी नगरसेवक नगरसेविका दोन्ही मंडळ अध्यक्ष व पदाधिकारी दिवस-रात्र मेहनत करून आपल्या पक्षाचा उमेदवार विजयी करून आणू असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
देवेंद्र कोठे यांना उमेदवारी देण्याला जवळपास 22 जणांनी विरोध केला आहे.महेश कोठे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहर उत्तरचे उमेदवार असणार आहेत. माजी महापौर महेश कोठे हे देवेंद्र कोठे यांचे काका आहेत.
एकाच पक्षात राष्ट्रवादी व भाजपा अशी उमेदवारी दिल्यास आपल्या पक्षाची प्रतिमा मलिन होईल. त्यामुळे देवेंद्र कोठे यांना पक्षाची उमेदवारी देऊ नये अशी मागणी सोलापूर शहरातील पदाधिकारी नगरसेवक नगरसेविका आणि मंडल अध्यक्षांनी केली आहे.
यांनी केला आहे देवेंद्र कोठे यांना विरोध…
शिवानंद पाटील,पांडुरंग दिड्डी, अनंत जाधव, जय साळुंखे, विजया वड्डेपल्ली, सुनील गौडगाव, दत्तात्रय गणपा, यांच्यासह काही नगरसेविका आणि पदाधिकारी यांनी विरोध केला आहे.