मुंबई : महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा आणि आर्थिक लाभ मिळावा यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात येणारे शालेय गणवेशाचे शिलाईकाम महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (मविम) बचत गटांकडून करून घेण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात मविम बचत गटांकडून शिवणकाम केलेल्या शालेय गणवेशाचे वाटप महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते (ऑनलाइन) करण्यात आले.
मंत्री कु.तटकरे यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयात प्रातिनिधीक स्वरूपात काही शाळांमध्ये मुलांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव, मविमच्या व्यवस्थापकीय संचालक माया पाटोळे (ऑनलाइन) सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील काही बचतगट आणि शाळेतील विद्यार्थी शिक्षक (ऑनलाइन) उपस्थित होते.
मंत्री कु. तटकरे म्हणाल्या की, केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेतील इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील मुले तसेच दारिद्र्य रेषेखालील पालकांची मुले, यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येतो.
यावर्षी ‘एक राज्य एक गणवेश’ योजनेनुसार राज्यभरात एकाच रंगाचे गणवेश वाटप करण्यात येत आहेत. त्यामुळे एकसमानता पाहायला मिळते.
यापुढे गणवेश शिवणकाम करताना शालेय शिक्षण विभागाचे आणि मविमच्या तेजस्विनी या नावाचे स्टिकर लावता येतील का, याचाही विचार करावा, अशा सूचना करून बचत गटांच्या महिलांना रोजगार निर्मितीची संधी दिल्याबद्दल मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे आभार मानले.
महिलांना गणवेश शिवणकाम देण्यापूर्वी गावाचे स्कोप मापिंग करण्यात आले. महिलांची संख्या निश्चित करण्यात आली. महिला दिवसाला किती ड्रेस शिवतात, याची संख्या काढण्यात आली आहे त्यानुसार गणवेश संख्या देण्यात आली आहे. आता शाळा सुरू झाल्या असून राज्यभरात गणवेशाचे वाटपही सुरू झाले आहे. या निर्णयामुळे मुलांना गणवेश वेळेत मिळण्यास मदत होत आहे आणि महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळाला असल्याचे मंत्री कु. तटकरे यांनी यावेळी सांगितले.
००००
काशीबाई थोरात/विसंअ/