मुंबई : राज्यातील कुपोषणाचे व बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे, स्तनपान व शिशुपोषण याबाबत शास्त्रोक्त ज्ञानाद्वारे आनंदी मातृत्वाची संकल्पना समाजामध्ये रूजवण्याच्या उद्देशाने विविध शासकीय व अशासकीय घटकांच्या समन्वयातून सातारा जिल्ह्यामध्ये ‘मिशन धाराऊ माता- दुग्धामृतम्’ ही अभिनव योजना राबविण्यात येत आहे. ही योजना शासनाच्या विविध विभागाच्या समन्वयातून सामाजिक लोकचळवळ म्हणून राज्यभर राबविण्यासाठी नियोजन करावे,असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.
मंत्रालयात मंत्री आदिती तटकरे यांनी सातारा जिल्ह्यातील मिशन धाराऊ अभियानाचा आढावा घेतला. यावेळी महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव, एकात्मिक बाल विकास योजना आयुक्त कैलास पगारे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
बालकाच्या शारीरिक विकासात स्तनपानाची भूमिका मोलाची असते. परंतु, आजही समाजात याबाबत गैरसमजुती पाळल्या जातात. याचा परिणाम नंतर बालकांच्या वाढीवर होतो. यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज भासते. अशा प्रकारचे मार्गदर्शन सहज आणि सोप्या पद्धतीने उपलब्ध होण्यासाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजना, जिल्हा आरोग्य कार्यालय, जिल्हा शल्यचिकित्सक, युनिसेफ, राजमाता जिजाऊ बाल आरोग्य व पोषण मिशन, बीपीएनआय (महाराष्ट्र) ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शिक्षण विभाग, स्थानिक अशासकीय संस्था यांच्या माध्यमातून सामाजिक चळवळ म्हणून जनजागृती केली पाहिजे, असे सांगून मंत्री आदिती तटकरे यांनी ‘मिशन धाराऊ’ तसेच अभियानाच्या यशाबद्दल माहिती घेतली.
या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी मदर सपोर्ट ग्रुपची निर्मिती करण्यात येत आहे. यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा, प्राथमिक शिक्षिका, ग्रामसेविका, महिला लोकप्रतिनिधी व इतर तज्ज्ञ स्थानिक महिला यांचा समावेश मदर सपोर्ट ग्रुपमध्ये करण्यात येत असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.