MH 13 NEWS NETWORK
नांदेड : लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने यावेळी 85 वयोमर्यादा पेक्षा अधिक वय असणारे मतदार व 40 टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांग असणारे मतदार यांच्यासाठी गृह मतदानाची व्यवस्था केली आहे. पहिल्या दिवशी अनेक मतदारांनी या टपाली मतदान प्रक्रियेला उत्तम प्रतिसाद दिला.
नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, भोकर, नायगाव, देगलूर आणि मुखेड या विधानसभा क्षेत्रातील दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आज ही मोहीम राबविण्यात आली. उपजिल्हाधिकारी संगीता राठोड या कक्षाच्या प्रमुख आहेत त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मतदान केंद्रावर येऊन मतदान करू न शकणारे व ज्यांनी बारा डी फॉर्म भरून दिलेला आहे अशा एकूण ६९९ मतदारांसाठी ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघांमध्ये ५९२ जेष्ठ नागरिक आहेत तर १०७ दिव्यांग आहेत.
नांदेड लोकसभेच्या सहा विधानसभा क्षेत्रामध्ये आज ही प्रक्रीया करण्यात आली. मतदारांच्या घरी जाऊन मतदान केंद्र प्रमाणे पूर्ण गोपनीयता राखून ही टपाली मतदान प्रक्रिया पार पाडण्यात आली. पहिल्या दिवशी संपूर्ण लोकसभा क्षेत्रात किती टपाली प्रक्रिया पार पाडण्यात आली याची आकडेवारी रात्री उशिरा स्पष्ट होणार आहे या मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी उमेदवारांच्या प्रतिनिधीना उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले होते. आज अनेक जेष्ठ नागरिकांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या या सुविधेबद्दल समाधान व्यक्त केले.