mh 13 news network
लिंगायत समाजाकडून या घटनेचा जाहीर निषेध
सोलापूर – बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य आहे. या घटनेचा समस्त लिंगायत समाजाकडून जाहीर निषेध करत आहोत. स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कुटुंबाच्या पाठीशी समस्त लिंगायत समाज उभा आहे. महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. भविष्यात अशा घटना घडू नये. जाती धर्मात तेढ निर्माण होऊ नये. गुन्हेगारांना कायद्याविषयी धाक बसावे याकरिता या प्रकरणातील जे कोणी आरोपी असतील त्यांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी राज्य सरकारकडे लिंगायत धर्मगुरू जगद्गुरु चेन्नबसवानंद महास्वामीजी (बेंगलोर) यांनी कुंभार वेस येथील किरीटेश्वर संस्थान मठात पत्रकार परिषदेत मागणी केली आहे.
जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत लिंगायत समाज स्वस्थ बसणार नाही. राज्य सरकार यात दिरंगाई केल्यास न्यायासाठी लिंगायत समाज रस्त्यात उतरल्याशिवाय राहणार नाही. असा इशारा जागतिक लिंगायत महासभेचे प्रदेश कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे यांनी दिला आहे.या पत्रकार परिषदेस तेलंगणा राष्ट्रीय बसव दलाचे अध्यक्ष नागनाथ पाटील, लिंगायत समन्वय समितीचे शहर अध्यक्ष सकलेश बाबुळगावकर, राष्ट्रीय लिंगायत महामंचचे जिल्हाध्यक्ष नामदेव फुलारी, शहराध्यक्ष सिद्धाराम कटारे, जगदीश कोरीमठ आदी उपस्थित होते.