सोलापूर | प्रतिनिधी – चोरीचे सोने विकत घेतल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या विकास अशोक जाधव (वय 38, रा. बार्शी) या सोनारास मुंबई उच्च न्यायालयाने २५,००० रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती एन. आर. बोरकर यांनी हा आदेश दिला.
बार्शीतील मोहित अलंकार या दागिन्यांच्या दुकानाचे मालक संजय जगदीश महादानी यांनी सुवर्णकार शुभम वेदपाठक याच्यावर ३८ लाखांचे, ४२५ ग्रॅम सोने बनविण्यास दिले होते. मात्र, वेदपाठकने दागिने न बनवता सोने गायब केल्याचा संशय आल्याने महादानी यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.पोलिस तपासात वेदपाठकने सदरपैकी ३२ ग्रॅम सोने विकास जाधव यास विकल्याचे निष्पन्न झाले.

त्यावरून पोलिसांनी जाधव यास अटक केली होती. त्याचा जामिनासाठीचा अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला होता.त्यानंतर अॅड. रितेश थोबडे व अॅड. ओंकार वाघोले यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला.

सुनावणीदरम्यान आरोपीकडून काहीही हस्तगत झालेले नसल्याने त्यास जामीन मंजूर करण्यात यावा, असा युक्तिवाद करण्यात आला. न्यायालयाने तो मान्य करत २५,००० रुपयांच्या जातमुचलक्यावर जाधव यास जामीन मंजूर केला.या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अॅड. विनोद चाटे यांनी काम पाहिले.