मुंबई :- सामाजिक न्यायाच्या संकल्पनेचे जनक, रयतेचे राजे, लोकराजे, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्णजयंती निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या कार्याला, विचारांना, स्मृतींना कृतज्ञतापूर्वक वंदन केले आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन, त्यांनी दाखविलेल्या मार्गाने सर्वांना सोबत घेऊन सर्वसमावेशक विकासाच्या वाटेवरची महाराष्ट्राची वाटचाल कायम राहील, असा विश्वास व्यक्त करतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या संदेशात म्हणतात की, राजर्षी शाहू महाराजांच्या प्रगत, पुरोगामी, सुधारणावादी विचारांवर देशाची दमदार वाटचाल सुरु आहे. ‘शिव-शाहू-फुले-आंबेडकर’ या विचारांवरच पुरोगामी महाराष्ट्र देशात आपले वेगळेपण टिकवून आहे, तोच महाराष्ट्राच्या प्रगतीचा पाया आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी राज्याची संकल्पना, त्यांच्या विचारांचा, कार्याचा कृतिशील वारसा खऱ्या अर्थाने पुढे नेण्याचे काम छत्रपती शाहू महाराजांनी सक्षमपणे केले. राजर्षी शाहू महाराजांचे कार्य प्रत्येक राज्यकर्त्यासाठी, सरकारसाठी मार्गदर्शक आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज खऱ्या अर्थाने लोकोत्तर राजे होते. लोकांनी त्यांच्या कामासाठी सरकारच्या दारात येण्याची गरज नाही, सरकारचं लोकांच्या दारात जाईल, हा विचार शाहू महाराजांनी त्यांच्या संस्थानात अंमलात आणला. त्याच विचारांवर राज्य शासन काम करत आहे. त्यामुळे ‘शासन आपल्या दारी’सारख्या लोककल्याणकारी अभियानाची अंमलबजावणी राज्यात प्रभावीपणे सुरु आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या प्रेरणेने यापुढेही महाराष्ट्राच्या विकासाची वाटचाल सुरु राहील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शाहू महाराजांच्या कार्याचे, विचारांचे स्मरण करुन त्यांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले आहे.