गोसीखुर्द जलाशय भूमिपूजन कार्यक्रमातील घटनेबाबत वस्तुस्थिती
भंडारा : भंडारा जिल्हा येथे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गोसीखुर्द या जागतिक दर्जाच्या जल पर्यटन प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान जल पर्यटनाची प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी जलसफर करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावेळेस नाशिक बोट क्लब येथील दोन बोटी आणल्या होत्या. त्यातील एका बोटीमध्ये मुख्यमंत्री श्री.शिंदे, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्यासह आठ जण होते. तर दुसऱ्या बोटीमध्ये पत्रकार होते. या बोटीचे वाहक गोविंद खवणेकर होते.
बोट सफर करताना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी प्रतिकात्मक म्हणून स्वतः बोट चालवण्याची इच्छा व्यक्त केली. मुख्यमंत्री बोट चालवतानाचे क्षण टिपण्यासाठी दुसऱ्या बोटीतील सर्व पत्रकार एकदम बोटीच्या पुढील भागात आले. बोट चालक श्री. खवणेकर यांनी सर्व पत्रकारांना एका बाजूला न जाण्याची आणि बसण्याची वारंवार विनंती केली. मात्र, पत्रकारांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे सर्व पत्रकारांचे वजन पुढील एका बाजूस झाल्यामुळे बोटीचा पुढचा भाग थोडासा पाण्यात गेला. बोट एका बाजूला गेल्यामुळे बोटीतील बसण्याचा भाग जो बोटीला स्क्रूने फिट केलेला असतो तो ओढला गेला व सोफासेट पाण्यात पडला. घटनेमध्ये प्रसंगावधान राखून बोटीचे चालक श्री. खवणेकर यांनी सर्व पत्रकारांना व्यवस्थित बोटमध्ये बसवले आणि बोट पूर्ववत झाली.
त्यादरम्यान या कार्यक्रमासाठी महामंडळाद्वारे सुरक्षेसाठी जेटस्की आणि जिल्हा प्रशासनातर्फे रेस्क्यू टीम तैनात केली होती. ते सर्व काही क्षणात आले आणि पत्रकारांना कार्यक्रमस्थळी नेले. या घटनेच्या वेळी मुख्यमंत्री स्वतः घटनाग्रस्त बोटीकडे गेले आणि त्यांनी निश्चित केले की बोट आणि सर्व प्रवासी सुखरूप आहेत. या घटनेमध्ये कोणालाही कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही. कोणतीही व्यक्ती पाण्यात पडली नाही. बोटीला कोणतेही नुकसान झालेले नाही. सबब घटनेनंतर माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेले वृत्त ‘बोटीचे तुकडे झाले, बोट बुडाली’ हे पूर्णपणे चुकीचे असल्याचे डॉ.सारंग कुलकर्णी, महाव्यवस्थापक तथा मुख्य प्रशिक्षक, एमटीडीसी यांनी कळवले आहे