मुंबई | प्रतिनिधी
बार्शी तालुक्यातील ताडसौंदने परिसरात खानदानी दुश्मनीतून झालेल्या दुहेरी खुनाच्या प्रकरणात अटकेत असलेल्या राहुल बोराडे आणि सुभाष बोराडे या दोघा आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती अश्विन भोबे यांच्या खंडपीठाने दोघांना जामीनावर मुक्त करण्याचे आदेश दिले.
या प्रकरणात कृष्णा पाटील आणि माणिक सातपुते यांची हत्या झाली होती, तर सुदाम चव्हाण हा गंभीर जखमी झाला होता.
पोलिस तपासानुसार..!
संशयित आरोपी व मयत कृष्णा पाटील यांच्यात खानदानी वैर होते. या दुश्मनीच्या पार्श्वभूमीवर संशयित आरोपींनी खुनाचा कट रचून, मोटारसायकलवरून जाणाऱ्या पाटील, सातपुते आणि चव्हाण यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक देऊन तिघांना खाली पाडले आणि डोळ्यात चटणी टाकून धारदार शस्त्रांनी वार केले.
या हल्ल्यात पाटील आणि सातपुते जागीच ठार झाले, तर चव्हाण गंभीर जखमी झाला होता.
या प्रकरणात आरोपी राहुल बोराडे आणि सुभाष बोराडे यांना पोलिसांनी अटक केली होती.
आरोपींच्या वतीने बार्शी सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र, सत्र न्यायालयाने तो फेटाळून लावला. त्यानंतर आरोपींनी उच्च न्यायालयात ॲड. जयदीप माने यांच्या माध्यमातून जामिनासाठी अर्ज केला होता.
मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान, आरोपींचे वकील आणि सरकार पक्षाचे वकील यांच्यात युक्तिवाद झाला. सरकार पक्षातर्फे ॲड. अश्विनी टाकळकर यांनी काम पाहिले. सर्व बाजूंनी युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर, न्यायमूर्ती अश्विन भोबे यांनी दोन्ही आरोपींना जामिनावर मुक्त करण्याचे आदेश दिले.