राजधानी दिल्लीतील विविध मराठी गणेश मंडळांतही गणरायांचे उत्साहात आगमन
नवी दिल्ली, ढोल-ताशांवरील ठेका आणि ‘गणपती बाप्पा मोरया’ च्या जयघोषाने कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदन आज दुमदुमले. लाडक्या बाप्पांच्या आगमनासाठी गणेशभक्तांनी एकच गर्दी केली . गणरायाच्या आगमनासाठी असेच जल्लोषपूर्ण व भक्तिमय वातावरण संपूर्ण दिल्ली व राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात दिसून आले.
महाराष्ट्र सदनातील सार्वजनिक गणेशोत्सव समितीच्या वतीने कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनात आज गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. तसेच दिल्लीच्या वेगवेगळया भागातील विविध गणेश मंडळांतही उत्साहाच्या वातावरणात आज गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आनंद व उत्साहाच्या वातावरणात साजरा होणारा गणेशोत्सव महाराष्ट्राबाहेर राजधानी दिल्लीतही उत्साहात साजरा करण्याची परंपरा आहे. महाराष्ट्र सदनात सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने आयोजित गणेशोत्सवात महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त रूपिंदर सिंग यांनी गणरायाची पूजा केली. सहायक निवासी आयुक्त श्रीमती स्मिता शेलार यांच्यासह दिल्लीस्थित महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी, गणेशभक्त यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते.
तत्पूर्वी, आज सकाळी येथील कोपर्निकस मार्गावर जल्लोषात गणरायाची मिरवणूक काढण्यात आली. ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘मंगलमूर्ती मोरया’ या घोषणा, ढोल ताशांचा गजरामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले. मिरवणुकीनंतर शासकीय पूजा, मंत्रोच्चार व श्रींची आरती होऊन गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
दिल्ली व राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्रातील जवळपास ३८ मराठी गणेशोत्सव मंडळातही आज गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी ढोल-ताशांच्या गजरात बाप्पांच्या आगमनाचा जल्लोष सर्वत्र साजरा करण्यात आला.
गणेशोत्सव काळात कार्यक्रमांची रेलचेल
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दिल्ली व परिसरात गणेशोत्सव काळात सांस्कृतिक कार्यक्रमांची मोठी रेलचेल आहे. विविध गणेश मंडळांनी या काळात महाराष्ट्राच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मराठमोळी लावणी, नाटक, संगीत रजनी, झांज पथकांचे सादरीकरण, कीर्तन, भजन संध्या आदी कार्यक्रमांचे भरगच्च आयोजन यावर्षीच्या गणेशोत्सवादरम्यान करण्यात आले आहे. विविध क्षेत्रात कार्यरत मराठींसह अमराठी गणेशभक्तही गणेशोत्सवात मोठया प्रमाणात सहभागी होतात.